बनोटी तांडा येथे शेतमजुराचा सिनेस्टाईल अपहरण. पैसे द्या भाऊ घेऊन जा अशी धमकी.
सोयगाव तालुका प्रतिनिधी
तन्मय सुनिल जैन
7588165274
सोयगाव : – मोठ्या भावाकडे उसतोडीच्या व्यवहारातील राहीलेल्या दोन लाख रुपयांसाठी लहान भावाचे बीड जिल्ह्यातील सहा जणांनी सिनेस्टाईल अपहरण केल्याची घटना सोयगाव तालुक्यातील बनोटीतांडा येथे बुधवारी (दि. २९) सकाळी नऊ वाजता घडली. याप्रकरणी अपहरण झालेल्या तरुणाच्या पत्नीने बनोटी पोलिस चौकीत तक्रार दिली आहे.
आबा धनराज चव्हाण (वय ३०, रा. बनोटीतांडा) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. उदरनिर्वाहासाठी चव्हाण कुटुंबीय दरवर्षी ऊसतोडीसाठी जातात. बनोटीतांडा येथील बाबु चव्हाण याने बीड जिल्ह्यातील काही मुकादम टोळीकडून ऊसतोडीसाठी गतवर्षी पाच लाख रुपये घेतले होते. मात्र काही दिवसानतंर ऊसतोडीसाठी मजूर घेऊन जाण्यावरुन त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर बाबु चव्हाण याने संबंधितांना तीन लाख रुपये परत केले, तर दोन लाख रुपये काही दिवसांनंतर देतो, असे सांगितले. मात्र अद्याप पैसे न दिल्याने बीड जिल्ह्यातील काही मुकादमांची टोळी मंगळवारी रात्रीपासून चारचाकी वाहनातून आली होती. या वाहनातील सहा जणांनी आज सकाळी बैलगाडीतून शेताकडे जाणाऱ्या आबा चव्हाण यास सोबत नेले. दरम्यान, आमचे दोन लाख रुपये घेऊन ये अन् तुझ्या भावाला घेऊन जा, अशी धमकी फोनवरुन देत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. सोयगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशीरापर्यंत सुरु होती..