चेकमेट…….

चेकमेट…….

चेकमेट.......

✍अजित दुराफे ✍
मुंबई महानगर प्रतिनिधी
77180 95197

मुंबई : -बुद्धिबळाच्या खेळात समोरच्याला आपलं प्याद खायला देऊन त्याचा वजीर खाण्याची खेळी घातक मानली जाते. महाराष्ट्रात सध्या अशीच खेळी सुरु आहे. ज्याचे दूरगामी परीणाम होणार आहेत. या एका खेळीने अनेक पक्षी मारले गेले आहेत.

१) आपला पक्ष आणि आपला नेता मुख्यमंत्री पदासाठी आसुसलेला नाही हे भाजपने स्पष्ट केलं आहे. २.५ वर्षापूर्वी मुख्यमंत्री पदाच बंद खोलीतील वचनासाठी लांब गेलेली शिवसेना आजच्या निर्णयाने लोकांसमोर तोंडघाशी पडू शकते. आता यावर एक प्रश्न असा असेल की मग २.५ वर्षापूर्वी हे पद शिवसेनेला का दिलं गेलं नाही तर त्यामागे अहंकार आणि प्रशासकीय अनुभव कारणीभूत होता असं मला वाटते. त्याच सोबत आत्ता असलेली समीकरणं वेगळी आहेत हा ही एक भाग आहे.

२) माननीय बाळासाहेब ठाकरे कधीच राजकारणात राहिले नाहीत पण राजकारणाचं सत्ताकेंद्र आणि रिमोट कंट्रोल मात्र त्यांच्याकडे होतं. आज त्याच जागेवर फडणवीसांनी आपली वर्दी लावली आहे. स्वतः सत्तेबाहेर आणि पदाबाहेर राहून त्यांनी विरोधी लोकांना आणि पक्षांना असं चेकमेट केलं आहे ज्यातून सावरणं येत्या काळात त्यांना कठीण जाईल असं मला वाटते.

३) फडणवीस मुख्यमंत्री झाले असते तर कदाचित लोकभावना महाविकास आघाडी च्या बाजूने वळाली असती. तसेच पुन्हा फोडाफोडीचं राजकारण झालं असतं. पुन्हा सरकार पाडण्यासाठी आणि सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा विरोध करण्यासाठी प्रयत्न केले गेले असते. या पेक्षा आजच्या खेळीने या सर्व शक्यतांवर त्यांनी एक प्रकारे पूर्णविराम लावला आहे. उद्या जरी सरकार निष्क्रिय ठरलं तरी फडणवीस आणि भाजपा त्यात भरडली जाणार नाही हे स्पष्ट आहे. याच कारण निर्णय प्रक्रिया आता पुन्हा एकदा शिवसेनेकडे आली आहे.

४) मला राजकारणातील सगळ्यात आवडलेला निर्णय आहे. यासाठी नाही की मी कोणत्या पक्षाचा समर्थक अथवा विरोधक आहे. यासाठी की राजकारण काय असते आणि त्यातून आपण काय शिकायला हवं हे यात शिकण्यासारख आहे. पद येतात जातात. महत्वाचं असते की तुम्ही त्यात टिकून कसे राहतात. भाजपा चा हा निर्णय शिवसेना या पक्षाचं नेतृत्व बदलाकडे जाणारा आहे. ठाकरे म्हणजे शिवसेना नाही. शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि त्यांच हिदुत्व हे जो पुढे नेईल तीच शिवसेना हा विचार येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

५) हा निर्णय एकट्या फडणवीसांचा नाही. यात राष्ट्रीय नेतृत्व चातुर्याचा भाग आहे. खुर्चीवर न बसता सुद्धा खुर्ची आणि जनमानसात आपली प्रतिमा, पक्ष आणि जनसंपर्क कसा वाढवला जाऊ शकतो याच एक मोठं उदाहरण म्हणून आजचा निर्णय इतिहासात नोंदला जाईल हे नक्की.