महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल
लैंगिक छळ तक्रार समिती गठीत अलिबागच्या अँड. निहा
राऊत यांची अध्यक्षपदी नियुक्ती
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- महिलांच्या सुरक्षेसाठी
लैंगिक छळ तक्रार समिती गठीत करण्यात आली असून अलिबागच्या ज्येष्ठ वकील अँड. निहा अनिस
राऊत यांची अध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे.
कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हास्तरावर “स्थानिक तक्रार निवारण समिती” ची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारींची प्रभावीपणे चौकशी व निवारण होणार आहे.
महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण करण्यासाठी “कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, २०१३” लागू करण्यात आला असून, त्यासोबतच दि. ०९ डिसेंबर २०१३ रोजी त्यासंदर्भातील नियमही प्रसिध्द करण्यात आले आहेत. सुप्रसिद्ध “विशाखा जजमेंट” मधील तरतुदींनुसार निर्गमित केलेले शासन निर्णय या अधिनियमानुसार अधिक्रमित करण्यात आले आहेत.
अधिनियमातील कलम ४ (१) नुसार, प्रत्येक कार्यालयात अशा प्रकारच्या तक्रारींच्या निवारणासाठी ‘स्थानिक तक्रार निवारण समिती’ गठीत करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याच अनुषंगाने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात खालीलप्रमाणे “स्थानिक तक्रार निवारण समिती” गठीत करण्यात आली आहे:
अध्यक्षः श्रीमतीअँड. निहा अनिस राऊत
सदस्यः श्रीमती माधवी समीर धारिया
सदस्यः श्रीमती एस. एम. वाघमारे
सदस्यः श्रीमती सुषमा शेषराव ढाकणे
सदस्य सचिवः श्रीमती सुहिता ओव्हाळ
ही समिती महिलांच्या तक्रारी ऐकून त्याचे योग्य चौकशी व निर्णय घेईल, जेणेकरून महिलांना सुरक्षित, सन्मानजनक व भयमुक्त कामाचे वातावरण मिळेल. अलिबाग मधील सामाजिक कार्यकर्त्या व ज्येष्ठ वकील अँड.निहा अनिस राऊत यांची या समितीवर सलग तिसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याने जिल्ह्यातून समाधान व्यक्त होत आहे व त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.