*डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर*

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961
अमरावती : -डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेतून गतीने तपासणी करून रुग्णांना चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले.
येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात आज डेंग्यूच्या चाचणी परीक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर चेतन गावंडे, मनपा विरोधी पक्ष नेता बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. प्रमोद भिसे, प्रयोगशाळा प्रमुख डॉ. मुक्ता देशमुख, तंत्रज्ञ अभिलाषा ठाकरे, डॉ. अर्चना निकम, डॉ. रंजना खोरगडे उपस्थित होते.
प्रयोगशाळेतील अद्ययावत उपकरणे आणि चाचणीसाठी लागणाऱ्या किटची माहिती श्रीमती ठाकूर यांनी जाणून घेतली. सूक्ष्मजीवशास्त्र विभागात ही प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आली असून अद्ययावत उपकरणांनी सज्ज आहे. तंत्रज्ञाच्या मदतीने चाचणी अहवाल तात्काळ देण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.