भुस्खलनाचा पुनश्च धोका असलेली 160 कुटुंबे स्थलांतरित

भुस्खलनाचा पुनश्च धोका असलेली 160 कुटुंबे स्थलांतरित

भुस्खलनाचा पुनश्च धोका असलेली 160 कुटुंबे स्थलांतरित

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 8830857351

चंद्रपूर, 30 ऑगस्ट
*दैनंदिन गरजा भागविण्यासाठी निधी देण्याचे वेकोलिला निर्देश
घुग्घुस येथील अमराई वॉर्डात झालेल्या भुस्खलनामुळे परिसरातील इतरही घरांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव 400 बाय 150 मीटर परिसरातील 160 घरे खाली करून कुटुंबांना स्थलांतरित केले आहे. स्थलांतरित केलेल्या कुटुंबाचे घरभाडे व दैनंदिन गरजा भागविण्यासाठी वेकोलि प्रशासनाने निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले आहे.
26 ऑगस्ट रोजी घुग्घुस शहरातील अमराई वॉर्डातील रहिवासी गजानन मडावी यांचे घर अचानक भुस्खलनामुळे 60 ते 70 फूट जमिनीखाली गेले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती प्राप्त होताच जिल्हा प्रशासन, नगर पालिका प्रशासन, वेकोलि प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन 50 मीटर परिसरातील घरे खाली करून सर्व कुटुंबांना नगर परिषदेच्या प्राथमिक शाळेत स्थलांतरित केले. या घटनेचे शास्त्रीय कारण जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केंद्र शासनाचे खाण सुरक्षा निर्देशालयाचे संचालक सागेश कुमार, वेकोलिच्या तांत्रिक विभागाचे गुप्ता, भुविज्ञान व खनिकर्म विभागाचे उपसंचालक सुरेश नैताम, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भुवैज्ञानिक मंगेश चौधरी, भारतीय भुवैज्ञानिक सर्वेक्षण, मध्य विभाग नागपूरचे वरिष्ठ भुवैज्ञानिक भुपेश उरकुडे, आशिष बारसाकडे यांच्याशी संपर्क केला असून, त्यांच्यामार्फत उक्त जागेचे शास्त्रीय सर्वेक्षण व त्याची कारणमीमांसा आदी बाबी तपशीलवार तपासून घेण्यात येत आहे.
अमराई वॉर्डातील घटनास्थळापासूनचे एक हेक्टर क्षेत्र धोकादायक घोषित करण्यात आले आहे. सर्व घरे खाली करून कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. कुटुंबाच्या निवासाची व जेवणाची व्यवस्था वेकोलिच्या प्रशासनाने करावी, अशा सुचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या आहेत. तसेच वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार प्रत्येक कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे.
खाण सुरक्षा निर्देशालय, भारत सरकार यांच्या सुचनेनुसार घटनास्थळापासूनच्या 400 बाय 150 मीटर परिसरातील 160 घरे खाली करून उक्त जागेवर वावर करण्यास स्थानिकांना मनाई करण्यात आली आहे. तसेच स्थलांतरीत केलेल्या कुटुंबांना पुढील सुविधा होईपर्यंत भाडे तत्वावर घर घेऊन राहायचे असल्यास त्यांच्या मासिक भाड्याची रक्कम व प्राथमिक गरजांकरीता आवश्यक निधी वेकोलि प्रशासनाकडून देण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी संबंधितांना दिल्या आहेत.