दिघी बंदराच्या विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी
६०५६ एकर जागेत राबविली जाणार योजना
रत्नाकर पाटील
अलिबाग तालुका प्रतिनिधी
९४२०३२५९९३
अलिबाग: महाराष्ट्र औद्योगिक कॉरिडोर विकास प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रातील दिघी बंदराच्या विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यानुसार दिघी पोर्ट इंटरस्ट्रीयल एरीया (डीपीआयए) एकूण ६.०५६ एकर इतक्या क्षेत्रात विकसीत केले जाणार आहे. गुंतवणुक क्षमता ३८ हजार कोटींची राहाणार असून, या क्षेत्राच्या माध्यमातून १ लाख १४ हजार १८३ जणांना रोजगार अपेक्षित असल्याचे अमरदिप भाटिया यांनी दिली.
यासंदर्भात पोस्कोकंपनी येथे पत्रकार परीषदेमध्ये माहिती देण्यात आली.या वेळी अमरदीप सिंग भाटिया,रजतकुमार सेनी,पी डी मलिकनेर,अनिल भंडारी उपस्थित होते.
या माहितीनुसार महाराष्ट्रातील औद्योगिक जोडणी परीक्षेत्र असलेल्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत दिघी पोर्ट इंटस्ट्रीयल एरीया (डीपीआयए) चा समावेश केलेला आहे. मुंबई शहरापासून दक्षिण दिशेला १७० किलोमीटर अंतरावर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर हे क्षेत्र वसलेले आहे. कोंकण रेल्वे मार्ग नजीक असल्याने या क्षेत्राला दळणवळणाच्या दृष्टीने दुहेरी लाभदायक ठरणार आहे. रायगड जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या ‘डीआयपीए’चे विकासाच्या दृष्टीने एकूण क्षेत्र ६०५६ एकर इतके निश्चित केले आहे. कोंकण रेल्वे सुविधेमुळे डेडिकेटेड फ्रेट कोरीडोर (डीएफसी) आणि जवाहरलाल नेहरु पोर्ट यांच्याशी जोडले जाण्याची दुहेरी संधी उपलब्ध आहे. या ठिकाणी ३८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, १ लाख १४ हजार १८३ जणांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल. यामध्ये अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, अन्न व प्रक्रिया उद्योग तसेच रासायनिक उद्योग, वस्त्रोद्योग या क्षेत्रातील कंपन्यांना हा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे.
भौगोलिक रचनेच्या दृष्टीने या क्षेत्राला दळणवळणाच्या व्यापक सुविधा उपलब्ध राहाणार आहेत. रस्ते मार्गाचा विचार केल्यास राष्ट्रीय महामार्ग ७५३ एफ माणगाव-पुणे तसेच राष्ट्रीय महामार्ग ६६ मुंबई-गोवा महामार्ग हा या क्षेत्रापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर आहे. तर राज्य महामार्ग क्रमांक ९७ हा अवघ्या १ किलोमीटर अंतरावर आहे. रेल्वे मार्गाचा विचार केल्यास कोलाड या क्षेत्रापासून ५ किलोमीटर आणि इंदापुर व माणगाव अवघ्या १० किलोमीटर अंतरावर असल्याने लोहमार्गाने प्रकल्प जोडला जाण्यास सुविधा होणार आहे. हवाई मार्गाचा विचार केल्यास या ठिकाणाहून मुंबई विमानतळ १७० किलोमीटर, सध्या विकसीत होत असलेला नवी मुंबई विमानतळ १२० किलोमीटर आणि पुणे विमानतळ ११६ किलोमीटर अंतरावर आहे. प्रकल्पांसाठी जलमार्गदेखील सुलभ असून, विविध बंदरे नजीकच आहेत. जेएनपीटी १०४ किलोमीटर, मुंबई पोर्ट १५३ किलोमीटर आणि दिघी पोर्ट ५५ किलोमीटर अंतरावर आहे.
या प्रकल्पांच्या वैशिष्ट्यांचा विचार केल्यास बंदरांशी संलग्न औद्योगिकीकरण असल्याने त्याचा फायदा येथील कंपन्यांना होणार आहे. तसेच रोजगाराशी निगडीत मुंबई महानगरावर असलेला भार हलका होण्यास मदत होणार आहे. मुंबई, पुणे या दोन्ही शहरांशी उत्तम संपर्क असल्याने या औद्योगिक क्षेत्राच्या विकासाची गती वाढण्यास मदत होणार आहे. याशिवाय इको दुरीझम व हेरीटेज दुरीझम या पर्यटन शाखांनाही प्रोत्साहन मिळणार आहे.