गुन्हा दाखल होताच अटकेच्या भितीने दिवाकर निकुरे फरार

गुन्हा दाखल होताच अटकेच्या भितीने दिवाकर निकुरे फरार

गुन्हा दाखल होताच अटकेच्या भितीने दिवाकर निकुरे फरार

🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा

ब्रम्हपुरी : 29 ऑगस्ट
राष्ट्रवादी काँग्रेसचा तथाकथित नेता, ब्रम्हपुरी व नागभीड परिसरात जमिनीच्या व्यवसायातून अनेकांची फसवणूक करणारा दिवाकर निकुरे याच्याविरूध्द 1 कोटी 11 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तो फरार झाला आहे. मंगळवारी त्याला अटक करण्यासाठी पोलिस त्याच्या घरी व संबधित अन्य ठिकाणी पोहोचले होते. मात्र, अटकेच्या भितीने दिवाकर फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, अटकपूर्व जामीनासाठी निकुरेचे प्रयत्न सुरू असले तरी आणखी अनेक फसवणुकीची प्रकरणे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ब्रह्मपुरी शहरातील देलनवाडी वॉर्डात राहणारे सेवानिवृत्त शिक्षक प्रमोद मेश्राम यांना नागपूरलगतच्या विहिरगाव येथे आपले लेआउट असल्याचे सांगून प्लॉटमध्ये पैसा गुंतविल्यास भविष्यात मोठा फायदा होईल, अशी थाप आरोपी दिवाकार याने मारली होती. त्यानंतर मोठमोठी आमिषे दाखवून बिल्डर दिवाकर निकुरे याने प्रमोद मेश्राम यांच्याकडून वेळोवेळी 1 कोटी 11 लाख रुपयांची रक्कम घेतली. काही महिन्यानंतर प्लॉटची विक्री करण्यासाठी मेश्राम यांनी निकुरेकडे तगादा लावल्यानंतर त्याच्याकडून वेळोवेळी टाळाटाळ केली जात होती. दरम्यान, या प्रकरणी ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर दिवाकर निकुरेवर सोमवारी रात्री फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हे दाखल झाल्याची कुणकुण निकुरेला लागताच अटकेच्या भितीने रात्रीपासूनच तो फरार झाल्याची माहिती ब्रह्मपुरीच्या ठाणेदारांनी दिली.
ब्रह्मपुरी शहरात काही वर्षांपूर्वी समोर आलेल्या गुंठेवारी प्रकरणातील दिवाकर निकुरे मुख्य आरोपी असून, प्लॉट विक्री करून देण्याच्या बहान्याने अनेक लोकांचा पैसा त्याने हडपला आहे. त्याच्यावर ब्रह्मपुरीसह इतरही काही पोलिस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, प्रमोद मेश्राम यांच्याकडून हडपलेल्या 1 कोटी 11 लाखांच्या फसवणूक प्रकरणात त्याच्यावर अटकेची टांगती तलवात असून, पोलिस त्याच्या मागावर आहेत.
दरम्यान, प्लॉट विक्रीच्या व्यवसायातून अनेकांना गंडा घालत गेल्या दोन वर्षांपासून तो राजकारणातही सक्रीय झाला होता. दरम्यान, मागील काही महिन्यापर्यंत काँग्रेसमध्ये काम करीत असताना मध्येच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात त्याने कोलांटउडी घेतली आहे. आता राष्ट्रवादीच्या माध्यमातून ब्रम्हपुरीत राजकीय पांघरून घालण्याचा प्रयत्न करीत असला तरी या फसवणुकीच्या प्रकरणाने अनेक कारनामे समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून त्याला अटक करण्यासाठी काही ठिकाणी पथक गेले होते. परंतु, तो आढळून आला नसल्याची माहिती ब्रह्मपुरीचे पोलिस निरीक्षक प्रमोद बानबले यांनी दिली. तरीही पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
===
विरोधकांच्या दबावाने गुन्हाः दिवाकर निकुरे

तक्रारदार व माझ्यामध्ये तत्कालीन ठाणेदार यांच्यासमोर लेखी स्वरूपात समझोता झाला आहे. त्यातील पार्ट पेमेंट करण्यात आले आहे. एनसी प्रकरण असताना राजकीय द्वेषातून विरोधकांनी दबाव आणून आपल्याविरोधात गुन्हा दखल करायला लावला, अशी प्रतिक्रिया दिवाकर निकुरे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here