अलिबाग – रोहा मार्गावरील पूल कोसळला

अलिबाग – रोहा मार्गावरील पूल कोसळला

रायगडात प्रशासन झोपेत, जनतेचे जीव धोक्यात”

“बंदी आदेश देण्यात प्रशासन तरबेज; दुरुस्ती मात्र शून्य!”

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
८४२०३२५९९३

अलिबाग:- रायगड जिल्ह्यातील धोकादायक अवस्थेतील पूल आणि साकवांचा प्रश्न हा नवीन नाही, पण प्रशासनाची बेफिकीरी मात्र दिवसेंदिवस ठळक होत आहे. वर्षानुवर्षे जीव धोक्यात घालणारे हे पूल दुरुस्तीसाठी हंबरडा फोडत होते, मात्र प्रशासनाने कानाडोळा केला. परिणामी शनिवारी सकाळी अलिबाग-रोहा या प्रमुख मार्गावरील पूल-साकव कोसळल्याने मार्ग बंद झाले आणि हजारो नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत.

या बाबत वृत्तपत्रात अनेक वेळ स्पष्ट इशारा दिला होता की, “जिल्ह्यातील अनेक पूल धोकादायक अवस्थेत आहेत. तातडीने दुरुस्ती न केल्यास भीषण अपघात होणारच.” पण नेहमीप्रमाणे प्रशासनाने तो इशारा धुडकावून लावला आणि बंदी आदेश देऊन प्रशासनाने हात वर केले होते आज हाच इशारा सत्य ठरून नागरिकांचे हाल सुरु झाले आहेत.
सकाळी सातच्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुदैवाने कोणतेही वाहन पुलावर नव्हते म्हणून मोठा अपघात टळला. पण रोज शेकडो दुचाकी व लहान वाहने या मार्गाने जात असतात. आता पूल कोसळल्यामुळे वाहतुकीला ब्रेक लागला असून गावकरी पूर्णपणे अडकले आहेत.

याआधीच रोहा मार्गावरील नवघर व सुडकोली पूल धोकादायक असल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यातच आता नांगरवाडी परिसरातील हा पूल कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत थेट प्रशासनाला जाब विचारला आहे – “ आधीच दिलेला इशारा जर प्रशासनाने गंभीरतेने घेतला असता, तर आज आम्हाला या संकटाला सामोरे जावे लागले नसते!”

जनतेच्या जीवाशी खेळणारे प्रशासन आधीच “बंदी आदेश” काढून मोकळे झाले आहे. हीच खरी शोकांतिका आहे. धोकादायक पूल दुरुस्त करण्याऐवजी प्रशासन त्यावर बंदी घालते, आणि नागरिक मात्र हाल सोसतात.
“तातडीने पूल-दुरुस्ती व पर्यायी व्यवस्था झाली पाहिजे, अन्यथा हा प्रश्न आणखी भीषण होणार आहे.” अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
……
रायगडातील पूल कोसळणे हा अपघात नाही, तर प्रशासनाच्या निष्क्रियतेचा आणि बेफिकीरीचा थेट पुरावा आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते अँड. राकेश पाटील यांनी केला आहे.

….
सरकार आणि प्रशासन नेहमीच ग्रामीण भागातील पूल आणि साकवांकडे दुर्लक्ष करत आहे. योग्य वेळी लक्ष दिले असते तर पूल तुटला नसता, अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे अँड.कौस्तुभ पुणकर यांनी दिली.