रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
१२.५ टक्के लाभांश जाहीर, १०,००० कोटींचा व्यवसाय टप्पा पार करणार
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ६४वी वार्षिक सर्वसाधारण सभा अलिबाग येथील बँकेच्या केंद्र कार्यालयात पार उत्साहात पडली. बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आर्थिक वर्ष २०२४–२५ चे निकाल जाहीर करताना सांगितले की, बँकेस ८५.८० कोटी रुपये इतका ढोबळ नफा तर ३५.५९ कोटी रुपये निव्वळ नफा मिळाला असून सभासदांना १२.५ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. बँकेच्या स्वनिधीचा ७०० कोटी रुपयांचा टप्पा बँकेने पार केलेला असून मार्च २०३० पर्यंत हा स्वनिधी १००० कोटीचा पूर्ण होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी व्यासपीठावर बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, बँकेचे विद्यमान संचालक, माजी संचालक द्वारकानाथ नाईक,बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, हे सभेस उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन जयंत पाटील म्हणाले की, सहकारी सुरुवात जर्मनीतून झाली आज संपूर्ण जगभरात हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे होत आहे, बँकेने सुद्धा या आर्थिक वर्षात स्वनिधी आणि व्यवसाय याकरिता मिशन १००० कोटी आणि मिशन १०,००० कोटी असे दोन ध्येय मिशन २०२८ म्हणून समोर ठेवलेले असून त्याकरिता बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांच्या अध्यक्षतेखाली ५ वरिष्ठ अधिकार्यांची समिती गठित करण्यात आलेली असून त्यामध्ये बँकेचा स्वनिधी १००० कोटी तर बँकेचा व्यवसाय पुढील २ वर्षात १०,००० कोटींपर्यंत नेणार असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. याकरिता बँकेने कृती आराखडा तयार केलेला असून हे मिशन २०२८ बँक वेळेपूर्वी नक्कीच गाठणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बँकेच्या व्यवसायात झालेल्या प्रगतीबद्दल त्यांनी बँकेने मागील ४ वर्षात आपला व्यवसाय दुप्पटीने वाढविला आहे याबाबत विस्तृत माहिती दिली. जुलै २०२५ अखेर बँकेने आपला हा व्यवसाय टप्पा ६६०० कोटींच्या पुढे नेलेला असून चालू आर्थिक वर्षात बँकेचा व्यवसाय ७००० कोटी रुपयांचा टप्पा पार करेल व पुढील दोन वर्षांत १०,००० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडेल, असा विश्वास बँकेचे अध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी व्यक्त केला. मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक आणि त्यांच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी याबाबत केलेल्या उत्कृष्ट कामाचे कौतुक करत त्यांनी वर्तक यांचे अभिनंदन केले.
सभेच्या सुरूवातीला बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे यांनी बँकेला जाहीर झालेल्या पुरस्कारविषयी माहिती देताना बँकेला मिळालेले २ राष्ट्रीय पुरस्कार आणि बँक असोसिएशन यांच्या वतीने मुख्य कार्यकारी मंदार वर्तक यांना मिळालेला बेस्ट सीईओ पुरस्कार याविषयी माहिती दिली. तर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या सादरीकरणात बँकेने या आर्थिक वर्षात नाबार्ड अध्यक्ष के व्ही शाजी यांच्या उपस्थितीत केलेला ऐतिहासिक टप्पा म्हणून विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांचे संगणकीकरण प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी याबाबत उपस्थितांना माहिती दिली ज्यामध्ये भारतातील पहिली सहकारी बँक म्हणून बँकेने सन्मान मिळविला आहे. हा प्रकल्प केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालय व नाबार्डचा महत्त्वाचा अजेंडा आहे. सोबतीला बँकेने गेल्या २० वर्षांपासून शून्य टक्के नेट एनपीए ही परंपरा यावर्षीही कायम राखण्यात आली आहे. शिवाय बँकेच्या नवीन संगणकप्रणालीमुळे अधिक गतिमान सेवा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असेही त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
या सभेत जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट विविध कार्यकारी संस्थांचा सन्मान करण्यात आला. त्यात मापगाव-अलिबाग अध्यक्ष संदेश थळे, वशेणी -उरण अध्यक्ष प्रभाकर जोशी, खारआंबोळी-मुरुड अध्यक्ष तुकाराम पाटील, चणेरा- रोहा अध्यक्ष गोपीनाथ गंभे, म्हसळा अध्यक्ष विनायक गिजे व पाली-उपग्राम- सुधागड अध्यक्ष गजानन शिंदे यांचा गौरव करण्यात आला. तसेच गडकिल्ले संवर्धन व जतन करणाऱ्या अलिबागधील दुर्ग रक्षक सामाजिक संस्था, खेलो इंडियामध्ये मार्शल आर्ट क्रिडा प्रकारात यश संपादन करणारी अलिबाग तालुक्यातील महाजने येथील श्रमिका श्रीधर पाटील, कमी वयात १५० गड किल्ले सर करणारी अलिबाग तालुक्यातील लोणारे येथील प्रसिद्ध गिर्यारोहिका शर्विका म्हात्रे आणि तिचे आई-वडील, गुंतवणूकीवर भर देऊन उद्योजक जगताचा उदयन्मुख चेहरा अलिबाग तालुक्यातील नागाव येथील सागर नाईक, सेलिब्रिटींसह विविध नामवंत मंडळींची रांगोळी काढणारे महाड येथील चित्रकार तथा शिल्पकार निलेश निवाते, दुर्गम भागातील मुलांच्या शिक्षणावर भर देणारे पनवेल-सारसई येथील संतोष शिंगाडे, सहकार क्षेत्रात भरारी घेणाऱ्या रोहा तालुक्यातील कोलाड येथील निलम कदम या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्यावतीने करण्यात आला.