मर्मबंधातली ठेव हि ….
वृद्धाश्रम..
एक आज्जी आजोबा.. आजोबा नव्वदीच्या घरात तर आज्जी पाच वर्षे मागे. दोघेही धडधाकट, स्वतःच स्वतः सगळं करणारे. त्यांना चार मुलं.. पण प्रश्न हा की आई वडिलांना सांभाळायचं कोणी.? ज्याला त्याला स्वतःची काही ना काही समस्या आणि अडचण.. आई वडिलांना ठेऊन घेण्यात असमर्थता आणि त्यासाठी अनेक कारणं. शेवटी आलटून पालटून एक महिना प्रत्येकाने सांभाळायचं असा मध्यम मार्ग निघतो. आई वडिलांची फाटाफूट केली जाते.. आई एकाकडे तर वडील एकाकडे.. पुन्हा पुढच्या महिन्यात अजुन दुसऱ्याकडे.. आठ महिने हे चक्र चालतं.. या आठ महिन्यात भेटायचं तर सोडा आज्जी आजोबांचे एकमेकांशी साधं फोनवर बोलणं पण होत नाही..
आज्जी आजोबा एकमेकांना भेटून आता आठ महिने झालेले असतात.. या आठ महिन्यात चारही मुलं वैतागतात. आई वडिलांना सांभाळायला कोणीच तयार होत नाही.. शेवटी त्यांची रवानगी वृद्धाश्रमात करण्याचा निर्णय होतो. एक दिवस वेळ ठरते.. आज्जी आजोबा दोघेही एकाच दिवशी वृद्धाश्रमात येतात.. मुलं त्यांना सोडुन निघून जातात. आज तब्बल आठ महिन्यांनी आज्जी आजोबा एकमेकांना बघत असतात.. वृद्धाश्रमात येण्याच्या दुःखा पेक्षा एकमेकांना भेटुन त्यांना झालेला आनंद चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असतो. एकमेकांना बघुन दोघेही हरखून जातात.. त्यांच्या चेहऱ्यावरचा सुखद आनंद लपत नाही..
वृद्धाश्रमातला पहिला दिवस.. त्याच दिवशीची संध्याकाळची वेळ असते. रात्रीची जेवण होतात.. आज्जी आजोबा इतक्या दिवसांनी एकत्र आल्याने एकमेकांच्या सोबत असतात.. गप्पा मारतात.. आणि पुढच्या अवघ्या तीन तासात आज्जी आपला प्राण सोडतात. बहुदा आजोबांना शेवटच भेटायचं होतं म्हणुन आज्जी प्राण मुठीत ठेऊन होत्या.. आजोबांना डोळा भरुन पाहिलं आणि आज्जीने प्राण सोडले होते. आजोबांना काही सुचत नाही, तोंडातुन शब्द फुटत नाही..
” अरे गेssssली रे ती..” आजोबा आर्त आवाजात आकांत करतात.. त्यांचा घसा कोरडा पडतो. आज्जीच्या निष्प्राण देहाचा हात हातात धरून आजोबा अक्षरशः गोठून जातात.. कितीतरी वेळ ते आज्जीच्या चेहऱ्याकडे एकटक बघत नुसतेच बसुन राहतात.. त्यांच्याकडे बघवत नाही.. त्यांच्या डोळ्यात अश्रूही नसतात. एका पुतळ्यासारखे ते स्तब्ध बसुन राहतात. पुढचे सोपस्कार पार पडते आणि पुढच्या सहा महिन्यांत आजोबा आपला देह ठेवतात….
आई वडील वैभव आहेत..
ती खरी श्रीमंती आहे..
ती सांभाळा..
एक लक्षात ठेवा, एक दिवस आपण पण वृध्द होणार आहोत..
काळ कोणाला सोडत नाही..
माझ्या समस्त मित्र-मैत्रीणी, बंधु-भगिनींना समर्पित….