शेषनाग: देव व मानवाचाही मित्र!

नुकतेच अनंत चतुर्दशीचे व्रत व पूजाविधी झालेली आहे, त्याच दिवशी गणरायाच्या मूर्तीचे वाजतगाजत मिरवणुकीद्वारे विसर्जनही झाले आहे. अनंत चतुर्दशी विशेष हा लेख वाचून काही चोखंदळ वाचकांनी ज्ञानवर्धक लेख असल्याची प्रतिक्रिया देत शेषनाग याविषयी माहिती विचारली होती. त्यामुळे शेषनागाची रोचक माहिती देणारा सदरील लेख श्री एन. कृष्णकुमार यांचा लेख…

     जेथे जावे तेथे, जेथे पहावे तेथे, जेथे ऐकावे तेथे, जेथे तेथे अगदी सर्वत्र “गणराया आले, गणराया गेले. गणेश विसर्जन झाले!” असे लोक बोलतांना आढळतात. जगन्नियंत्या-निर्मात्या विश्वपालकाचे आगमन वा गमन होईलच कसे? आदि-अनादी गणपती बाप्पा मोरयाचे विसर्जन होईलच कसे? कारण परमेश्वर हा नश्वर नाही. त्याला जन्म, मृत्यू, मध्यंतर अशी काहीएक मर्यादा नाही. तो येत नाही, जात नाही. तुतट नाही, फुटत नाही. तो अभंग आहे, अमर्याद आहे, अनंत आहे. एवढं मात्र खरंय, की त्यांचे प्रतिमा, फोटो, चित्र, पुतळा, मूर्ती, आदींचेच विसर्जन होऊ शकते. सोबतच आपल्याला स्वतःतील अवगुण वा दुर्गुण विसर्जित करावयाचे असतात, भगवंत, भक्त किंवा भक्ती यांचे विस्मरण करणे नव्हेच. म्हणून भक्त, भाविक, ज्ञानी, विद्वान, जाणकार यांनी गणेश विसर्जन असा शब्दप्रयोग न करता गणेशमूर्ती विसर्जन असे म्हणणेच त्यांना इष्ट ठरेल, शोभेल. असो…

     शेषनाग अर्थातच भगवान विष्णू एका सात फणी असलेल्या नागावर विश्राम घेत बसलेले आहेत, असे म्हटले जाते. तशीच श्रीविष्णूची प्रतिमासुद्धा काढलेली दिसते. नवनागांपैकी एक म्हणजे शेषनाग होय. याला देवांचा व मानवाचाही मित्र मानतात. श्रीविष्णूंचा अंशावतार म्हणूनही त्याच्याविषयी सांगितले जाते. कश्यप ऋषींच्या १३ बायकांपैकी कद्रु नावाच्या स्त्रीचा पुत्र शेषनाग असल्याचे भागवत पुराणात सांगितलेले आढळते. शेषनाग हा पाताळात राहत असून त्याने आपल्या मस्तकावर पृथ्वीचा भार घेतला आहे, अशी शास्त्रसंमत कल्पना करण्यात आली आहे. भगवंताचे शेषशायीरूप याच्यामुळे निर्माण झाले आहे. त्याला सहस्त्र मस्तके असल्याची कल्पना आहे. त्यामुळेच त्याने पृथ्वीला सहज तोलून अधांतरी धरले आहे. तो तिचा संपूर्ण भार सहन करत आहे. त्याच्या गळ्यामध्ये पांढरीशुभ्र रत्नमाला असून एका हातात नांगराचा फाळ व दुसऱ्या हातात कोयता आहे. असे चमत्कारिक वर्णन वाचावयास मिळते. गंगेने शेषनागाची भक्ती करून त्याच्याकडून ज्योतिष व खगोलशास्त्राचे ज्ञान मिळवले असे श्रीविष्णू पुराणात सांगितले आहे. मनात येईल त्याप्रमाणे रूप धारण करण्याची विद्या शेषनागाला ठाऊक होती. त्यामुळेच त्याचे अनेक अवतार व कला निर्माण झाल्या. वसुदेव नवजात बालकृष्णाला घेऊन गोकुळात निघाले असता धो धो पाऊस पडत होता, त्यावेळी त्या पावसापासून भगवान श्रीकृष्णाचे रक्षण करण्यासाठी शेषनागाने आपले फणाछत्र श्रीकृष्णावर धरले होते. प्रभू श्रीरामाचे बंधू लक्ष्मण, भगवान श्रीकृष्णाचे बंधू बलराम व महाभाष्यकार पतंजली हे शेषाचे अवतार समजले जातात. शेषनागास कालाचे प्रतीक मानले जाते. तो असंख्य रुपांनी सृष्टीच्या संकोच-विकासात सहभागी होत असतो. श्रीविष्णू पुराणामध्ये त्याची अशी स्तुती केलेली आहे-

     “त्वया धुतेयं धरणी विभर्ति चराचरं विश्वमनन्तमूर्ते| 

     कृतादि भेदै रज कालरुपो निमेषपूर्वी जगदेतदत्सि॥” 

याचा अर्थ असा- हे अनंतपूर्ती शेषा, तू ज्या धरित्रीला धारण करतोस, ती पृथ्वी चराचर विश्वाला धारण करते. हे अजा, तू कृतयुगापासून निमेषापर्यंत कालाचे भाग असणाऱ्या विश्वाचे रक्षण करतोस. सर्व जगाला शेषरुपी नागाने लपटलेले आहे, अशी कल्पना आहे. काल आणि दिक या दोहोंच्या खेचाखेचीत सृष्टीच्या उत्पत्ति, स्थिती व लयाची प्रक्रिया चालत राहणे महत्त्वाचे आहे. ज्यावेळी सर्व सृष्टीचा विनाश होतो, तेव्हा कालशेष शिल्लक राहतो. म्हणून काल आणि शेष हे दोघेही एकाच तत्त्वाचे पर्याय आहेत. देवी लक्ष्मी आणि वारुणी या शेषाची पूजा करतात आणि प्रलय काळामध्ये शेष विषयुक्त अग्निज्वाला बाहेर फेकत असतो, अशी ही कल्पना पुराण ग्रंथात मांडलेली आहे. पुराणात अनेक नागांचा उल्लेख आलेला आहे. जसे- वासुकी, शेष, पद्म, कंबल, कार कोटक, नागेश्वर, धृतराष्ट्र, शंख पाल, कालाख्य, तक्षक, पिंगल, महानाग आदी नागांचे वर्णन आहे.

    अनंत चतुर्दशीच्या दिवशी आद्यपुजेचे मानकरी, आद्य आराध्य दैवत श्री गणपती बाप्पाच्या मूर्तीजवळ गोपाळकाला गोड झाला. या कालाभजनाच्या वेळी संतवचन, कीर्तन वा प्रवचन श्रवणकर्ते संख्येने फारच कमी होते. मात्र प्रसाद घेण्यासाठी घरी आराम फर्मावत असलेले सर्व प्रसादभोक्ते लगबगीने मंडपात आले, त्यांनी तोबा गर्दी केली. लहानथोर मंडळी घरी असल्या नसल्यांची नावे सांगून “माझ्या बाबाला देगा, माझ्या आजीला देगा!…” प्रसाद मागू लागली. ओटी भरून भरून प्रसाद घरी घेऊन गेले. खरे तर… “दह्याचा काला गोड झाला! ज्याच्या दैवी त्याला मिळाला!!” अशी गावाकडील म्हण आहे. अर्थात जो पूर्ण वेळ हजर राहून भजन, कीर्तन, संतवचन किंवा प्रवचन यांचा पुरेपूर लाभ घेतो, त्यालाच हा प्रसाद गुणकारी ठरतो. जो घरबसल्या सेवण करतो, त्याला तो काहीही गुण देऊ शकत नाही. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी स्वतः हजर राहूनही म्हणत- 

    “तुका पाहे प्रसादाची वाट!

     द्यावे मज धुवोनिया ताट!!”

प्रसादाचे पात्र विसळून ते जरी प्राशन केले, तरी ते अमृताचे गुण देते. एवढी त्याचे अलौकिक महात्म्य आहे, मात्र पूर्ण वेळ हजर राहणाऱ्यासच ते कारगर ठरते. लेखाच्या शेवटी प्रश्न कायम राहतोच. तो प्रश्न “काला?” म्हणजेच “तू का आलास?” यावर ज्ञानी वाचकांनी अवश्यच विचार करावा, नम्र निवेदन!

 श्री एन. कृष्णकुमार, से. नि. अध्यापक.

 पिसेवडधा, आरमोरी, जि. गडचिरोली.

 फक्त व्हॉटसॅप- ९४२३७१४८८३.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here