बेरोजगारीचे भीषण वास्तव…

भारत हा तरुणांचा देश आहे. जगातील सर्वाधिक तरुण भारतात आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्के लोकसंख्या ही तरुणांची आहे. आज आपण याच तरुणांच्या जोरावर महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत आहोत. भारताचे माजी राष्ट्रपती, महान शास्त्रज्ञ डॉ ए पि जे अब्दुल कलाम यांचा तर तरुणांवर खूप विश्वास होता. या तरुणांमध्ये खूप ऊर्जा आहे. तरुणांच्या या ऊर्जेचा योग्य वापर झाल्यास भारताला महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही असा ठाम विश्वास डॉ ए पि जे अब्दुल कलाम यांना होता.

डॉ ए पि जे अब्दुल कलाम यांच्यासारख्या द्रष्ट्या व्यक्तीने जे ओळखले ते आजच्या राज्यकर्त्यांना मात्र ओळखता आले नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागेल कारण आजच्या तरुणांच्या ऊर्जेचा, त्यांच्या गुणवत्तेचा उपयोग सरकारला करून घेता येता नाही किंवा सरकार जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करत आहे याचा पुरावाच स्टेट ऑफ वर्किंग इंडिया २०३३ च्या अहवालातून पाहायला मिळतो.

या अहवालातून देशातील बेरोजगारीच्या समस्येचे भीषण वास्तव समोर आणले आहे. या अहवालानुसार देशात तरुण पदवीधर बेरोजगाराईचा दर ४२.३ टक्क्यांच्या उच्च स्तरावर आहे, तर कमी शिकलेल्या लोकांच्या बेरोजगारीचा दर ८ टक्के आहे. २५ ते ३० वर्ष वयोगटातील पदवीधर किंवा उच्च पात्रता धारक तरुणांचा बेरोजगरीचा दर २२.८ आहे. उच्च माध्यमिक स्तरावरील पात्रता असलेल्या आणि २५ वर्षापेक्षा कमी वयोगटातील तरुणांमध्ये बेरोजगारीचा दर २१.४ टक्के इतका आहे. याचाच अर्थ कमी शिकलेल्या पासून पदवीधर असलेल्या तरुणांपर्यंत सर्वांनाच बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत आहे. ही आकडेवारी चिंताजनक आहे.

देशातील ४० टक्क्यांहून अधिक तरुण जर बेरोजगार असतील तर त्या तरुणांच्या मानसिकता काय असेल याचा विचार न केलेलाच बरा. शिक्षण आहे, पदवी आहे, काम करण्याची उर्मी आहे, कुटुंबासाठी, देशासाठी काही तरी करुन दाखवण्याची इच्छा आहे मात्र नोकरी नाही अशी अवस्था तरुणांची आहे. नोकरी नसल्याने तरुणांमध्ये प्रचंड नैराश्य आले आहे. आपण इतके शिकूनही आपल्या शिक्षणाचा उपयोग होत नाही त्यामुळे तरुण प्रचंड अस्वस्थ आहेत. शासन रोज नवे परिपत्रक काढून तरुणांचा रोजगार हिरावून घेत आहे. आता तर सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करण्यात येणार आहे. म्हणजेच सरकारी नोकरी मिळवण्याचे तरुणांचे स्वप्न स्वप्नच राहणार आहे.

वास्तविक गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी नोकर भरती झालेली नाही. नोकर भरतीसाठी सरकार जाहिरात काढते. हजारो रुपये परीक्षा फी घेऊन तरुणांची परीक्षा घेते मात्र प्रत्यक्ष नोकरी काही देत नाही. कधी पेपर फुटीचे तर आणखी काही कारण देऊन भरती पुढे ढकलली जाते. शिक्षक भरती हे त्याचे उत्तम उदाहरण. आज सरकारच्या सर्वच खात्यात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. एक लिपिक चार चार टेबल सांभाळीत आहे, एक शिक्षक चार चार वर्ग शिकवत आहे, गेली अनेक वर्षे पदोन्नती झालेली नाही जर सरकारने सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय रद्द करून भरती केली तर देशातील बेरोजगारी काही प्रमाणात का होईना कमी होईल मात्र सरकारला तरुणांच्या रोजगाराचे काहीही देणे घेणे नाही. नोकरी मागायला गेलेल्या तरुणांना राजकीय नेते पकोडे तळा म्हणत त्यांची कुचेष्टा करत आहेत.

शिक्षण असून नोकरी नाही, शेती असून शेतात काही पिकत नाही. नोकरी नाही, शेतीही बेभरावशाची झाली आहे, स्वतःचा व्यवसाय करावा म्हटलं तर भांडवल नाही त्यामुळे आजचा तरुण प्रचंड अस्वस्थ आहे. या अस्वस्थतेचा उद्रेक केंव्हाही होऊ शकतो. जर तरुणांच्या अस्वस्थतेचा उद्रेक झाला तर भल्या भल्यांना पळता भुई थोडी होईल म्हणूनच सरकारने तरुणांच्या हाती रोजगार द्यावा. त्यांच्यात असलेल्या ऊर्जेचा राष्ट्रकार्यासाठी उपयोग करून घ्यावा. देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारने ठोस प्रयत्न करावेत.

श्याम ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे

मो: ९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here