जय भवानी हॉटेलचा निष्काळजीपणा उघड; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; बातमीची दखल

6

जय भवानी हॉटेलचा निष्काळजीपणा उघड; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; बातमीची दखल

संदेश साळुंके
खालापूर रायगड प्रतिनिधी
9011199333

खालापूर :- खालापूर तालुक्यातील चौक परिसरात अन्नसुरक्षेच्या नियमांकडे केलेल्या बेपर्वाईचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. वडापाव खाण्यासाठी गेलेल्या ग्राहकाच्या ताटात दिलेल्या लाल चटणीत मेलेली पाल (सरडा सदृश कीटक) आढळून आले. या घटनेनंतर ग्राहक स्तब्ध झाला असून परिसरात संतापाची लाट उसळली होती.

दुपारी घडलेल्या या घटनेत, ग्राहकाला चटणीत काहीतरी विचित्र दिसले. तपासणी केली असता त्यात मेलेली पाल असल्याचे स्पष्ट झाले. ग्राहकाने दुकानदाराचे लक्ष वेधले असता, सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित नागरिकांनी गोंधळ घातल्याने व्यवस्थापनाला अखेर माफी मागावी लागली. या घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने काही क्षणांतच प्रकरणावर चर्चेचा भडका उडाला.

अन्न पदार्थात अशा प्रकारे कीटक आढळल्याने अन्नसुरक्षेच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे उघड झाले आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला असून अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच रायगड जिल्हा परिषद यांच्याकडे तातडीने कारवाईची मागणी केली.

नागरिकांच्या मागणीनंतर व बातमी प्रकाशित झाल्यानंतर प्रशासनाने दखल घेतली आणि चौकशीसाठी जय भवानी हॉटेलवर धाड टाकली. यावेळी तेल आणि वडापावचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

या दरम्यान आदिवासी बांधवानी मीडिया वार्ता व प्रशासनाचे आभार व्यक्त केले. व जर ग्राहकांस काही त्रास झाला तर त्याचे वैद्यकीय खर्च हॉटेलचे मालक करणार असल्याचे कबूल केल्यावर आदिवासी बांधव शांत झाले.