आमच्या आरक्षणात घुसखोरी सहन करणार नाही
अनुसूचित जमाती संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- अनुसूचित जमाती बांधवांच्या आरक्षणात घुसखोरी सहन करणार नाही, असा इशारा देत रायगड अनुसूचित जमाती संघर्ष समितीतर्फे मंगळवारी ता.30 जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात डाॅ. बाबासाहेबर आंबेडकर यांना वंदन करून करण्यात आली. त्यानंतर वाजत-गाजत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला.
या वेळी माजी समाज कल्याण सभापती व आदिवासी समाज नेते दिलीप भोईर यांनी सांगितले की, रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात मोठ्या संख्येने आदिवासी, कोळी, भोई, धनगर, ठाकूर, कातकरी समाज फार पूर्वीपासून वास्तव्यास आहे. हे येथील मूळ निवासी आहेत. तरीदेखील सरकारने कायमच या समाजाकडे दुर्लक्ष केले आहे. आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण दिले. मात्र आता या आरक्षणात घुसखोरी होउन आदिवासी समाजाचा हक्क डावलण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र हे आदिवासी समाजबांधव खपवून घेणार नाही, असा निर्धार करीत या भव्य मोर्चा काढण्यात आला. जर शासनाने याची दखल घेतली नाही तर हा मोर्चा आणखी तीव्र करण्यात येईल. मंत्रालयावरही मोर्चा नेण्याची आमची तयारी आहे. त्यामुळे शासनाला हा खेळ थांबवावाच लागेल, असा इशारा त्यांनी दिला. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांना देण्यात आले. यानंतर मोर्चास्थळी उपस्थित समाज नेत्यांनी बांधवांना मार्गादर्शन केले.
या मोर्चात रायगड जिल्हा कातकरी समाज अध्यक्ष भगवान नाईक, आदिवासी कोळी कोकण विभागीय अध्यक्ष जलदीप तांडेल, अलिबाग तालुका कातकरी समाज अध्यक्ष मुकेश नाईक, ठाकूर समाज अध्यक्ष धर्मा लोगे, अलिबाग तालुका कातकरी समाज अध्यक्ष दत्ता नाईक, अलिबाग तालुका कातकरी समाज माजी अध्यक्ष सुरेश नाईक, मोरेश्वर हाडके, गजानन पाटील, रविंद्र वाघमारे, भरत पाटील, पांडुरंग वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.