रेंटल बाईक विरोधात संघर्ष

10

रेंटल बाईक विरोधात संघर्ष

ॲड. मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा चालक एकवटले

अलिबाग(रत्नाकर पाटील)

अलिबागमध्ये बेकायदेशीररित्या दुचाकी भाड्याने देण्याचा व्यवसाय चालत आहे. या व्यवसायाविरोधात रिक्षा चालक व मालक आक्रमक झाले आहेत. या रेंटल बाईक विरोधात संघर्ष सुरू झाला आहे. अलिबाग शहर, तालुका रिक्षा चालक व मालकांनी पेणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची भेट घेऊन हा व्यवसाय बंद करण्याची मागणी केली. ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हा लढा पुकारण्यात आला.

संबंधित विभागातील अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून, कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. वाढत्या बेकारीमुळे अनेक तरुण घरी बसले आहेत. परंतु, काही तरुणांनी स्वतःचा व्यवसाय चालविण्यासाठी पुढाकार घेतला. कर्ज काढून रिक्षा घेतली. या व्यवसायातून कुटूंबाचा उदरनिर्वाह चालविण्याचे काम रिक्षा चालक व मालक करीत आहेत. स्थानिकांसह पर्यटकांची ने आण करण्याचे काम रिक्षाद्वारे केले जाते. अलिबागमध्ये नोकरीनिमित्त येणारे कर्मचारी, कामगार तसेच पर्यटकांमार्फत रिक्षा चालकांना रोजगार मिळत आहे. मात्र, अलिबाग शहरासह परिसरात भाड्याने दुचाकी देण्याचा व्यवसाय गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. भाड्याने दुचाकी देण्याच्या व्यवसायाला परवानगी नसतानाही काही मंडळी खुलेआमपणे हा बेकायदेशीर व्यवसाय चालवित आहेत. त्याचा परिणाम अलिबागमधील रिक्षा चालकांच्या व्यवसायावर होत आहे. त्यामुळे रिक्षा चालक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

दुचाकी भाड्याने देण्याचा व्यवसाय चालविणारे मालक धनदांडगे व सेवानिवृत्त अधिकारी आहेत. त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी रिक्षा चालक व मालकांनी केली आहे. हा व्यवसाय बंद करावा अशी मागणी सातत्याने होत आहे. दुचाकी भाड्याने देण्याच्या व्यवसायाविरोधात ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा चालक व मालकांनी एल्गार पुकारला आहे. पेण येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांची सोमवारी भेट घेण्यात आली. दुचाकी भाड्याने देण्याचा व्यवसाय बेकायदेशीर चालत आहे. याची माहिती देण्यात आली. या अवैध व्यवसायावर कारवाई करावी अशी मागणी केली. रिक्षा चालक व मालक पर्यटनावर अवलंबून राहून रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करतात. रेंटल बाईक विरोधात कारवाई केली नाही, तर आगामी काळात उग्र आंदोलन केले जाईल. शेवटच्या क्षणापर्यंत रिक्षा चालक व मालकांसोबत राहिन, अशी ग्वाही यावेळी ॲड.मानसी म्हात्रे यांनी दिली.