रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक: ६५ वर्षांचा गौरवमयी प्रवास

41

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक: ६५ वर्षांचा गौरवमयी प्रवास

देशात सध्या ३५१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कार्यरत आहेत. यामध्ये सातत्याने रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही अग्रेसर बँक म्हणून लोकप्रिय झालेली पाहायला मिळते. शासनाच्या वतीने जिल्हा बँकेचे कामकाज अधिक व्यापक असावे याकरिता सहकारमहर्षि असलेल्या रायगड जिल्हा बँकेचा गौरव अनेक व्यासपीठावरून होताना अनेकांनी अनुभवला आहे. जिल्ह्यातील सहकारी संस्था असो वा राज्यातील सहकारी बँका, पतसंस्था तसेच सहकारी संस्था सदैव रायगड जिल्हा सहकारी बँकेच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करीत असतात. सक्षम नेतृत्व, उत्कृष्ट व्यवस्थापन, कौशल्यपूर्ण कर्मचारी यांच्यासोबत सर्व आधुनिक सेवा याद्वारे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने देशातील अग्रगण्य जिल्हा सहकारी बँक म्हणून शेतकऱ्यांचा आणि ग्राहकांचा विश्वास जिंकून त्यांचा आर्थिक साथीदार ठरली आहे. महाराष्ट्र सारख्या सहकार समृद्ध असलेल्या राज्यातील सहकारी परंपरेची जपणूक करणारी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वावलंबनाच्या स्वप्नाला प्रत्यक्ष रूप देणारी ही बँक यंदा आपल्या गौरवमयी ६५ वर्षांच्या प्रवासाला गाठली आहे.

कुलाबा ते रायगड- 

अर्थात या प्रवसाची सुरुवात ३० सप्टेंबर १९६० रोजी नोंदणीने झाली असली, तरी संचालक मंडळाचे अधिकार हाती घेण्याआधी काही प्रक्रिया पार पाडणे आवश्यक होते. पोटनियमांत तत्कालीन रजिस्ट्रार साहेबांनी काही बदल सुचवले आणि पहिले संचालक मंडळ सभासदांनी निवडले गेले. संचालक मंडळाची निवडणूक ६-७-१९६१ रोजी पार पडली व बोर्डाची पहिली सभा ७-८-१९६१ रोजी झाली. १-१०-१९६१ पासून बँकेचा कारभार हाती घेण्याचे ठरवण्यात आले. लागलीच महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेला हा निर्णय कळविण्यात आला, कारण त्या काळात ही बँक आपल्या जिल्ह्यांतील सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करत होती. १७-८-१९६१ रोजी बोर्डाच्या बैठकीत महाराष्ट्र स्टेट बँकेचे मॅनेजर डॉ. श्रीमाळ यांनी बँकेच्या कारभाराला मान्यता दिली. सुरुवातीस काही संचालक अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेला भेट देऊन कार्याची माहिती घेतली. २-१०-१९६१ रोजी महात्मा गांधी जयंतीच्या मुहूर्तावर तत्कालीन सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य , बाळासाहेब भारदे यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाले.अर्थात त्यावेळी बँकेचे नाव कुलाबा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असे होते. १९८१ सालापासून बँकेचे नाव रायगड किल्ल्याच्या नावावरून केलेल्या बदलाप्रमाणे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणून लोकप्रिय झाले.

 

त्या काळात शेतकऱ्यांसाठी कर्ज मिळवणे कठीण होते, प्राथमिक सहकारी संस्था कमी प्रमाणात कार्यरत होत्या आणि ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक व्यवहारांमध्ये सुविधा कमी होत्या. अशा परिस्थितीतही, रायगड बँकेने शेतकऱ्यांचा विश्वास जिंकत त्यांचा मजबूत आर्थिक साथीदार म्हणून स्थान निर्माण केले आणि आजही ही बँक संकल्पबद्ध पद्धतीने प्रगती करत आहे.

आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद

या दीर्घ प्रवासात अनेक आव्हाने आली—कधीकधी आर्थिक संकटे, कधीकधी तंत्रज्ञानातील मागासपणा, तर कधीकधी व्यवस्थापन आणि संस्थात्मक सुधारणांची गरज. पण प्रत्येक आव्हानाला संधीमध्ये रूपांतरित करण्याची दृष्टी आणि कठोर परिश्रम बँकेच्या नेतृत्वाची ओळख बनली. बँकेने प्रत्येक टप्प्यावर ग्रामीण अर्थव्यवस्था, शेतकऱ्यांच्या गरजा आणि सहकारी मूल्यांचा समन्वय साधून निर्णय घेतले, ज्यामुळे केवळ आर्थिक वाढच नव्हे तर सामाजिक समृद्धी देखील सुनिश्चित झाली.

अध्यक्ष व नेतृत्वाचा प्रभाव

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६५ वर्षांच्या गौरवमयी प्रवासात अध्यक्षाची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. स्थापनेपासूनच बँकेने सक्षम आणि दूरदृष्टीने नेतृत्व प्रदान करणाऱ्या व्यक्तींना आपल्या संचालक मंडळात निवडले.सर्वात दीर्घकालीन कार्यकाळ जयंत पाटील (17/03/1997 – आजतागायत) यांचा असून, त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेने तंत्रज्ञान, पारदर्शकता आणि शेतकरी कर्ज व्यवस्थापन यामध्ये उल्लेखनीय प्रगती साधली आहे. अर्थात जयंत पाटील यांचे प्रभावशाली नेतृत्वाने बँकेला दिलेली ओळख हा बँकेचा सुवर्णकाळ ठरला आहे तर दुसरीकडे, सुरुवातीच्या काळात, नारायण यशवंत नेने (1961–1968) यांनी शेतकरी कर्जव्यवस्था आणि प्राथमिक सहकारी संस्थांच्या संलग्नतेला स्थिर पाया दिला. अल्पकालीन कार्यकाळ व्ही. एस. जाधव (1968–1969) यांचा असून त्यांनी बँकेच्या प्रारंभिक टप्प्यातील संघटनात्मक स्थिरता सुनिश्चित केली. त्यानंतरचे नेतृत्व, जसे की एच. एम. वांगरे (1969–1973) आणि के. बी. पाटील (1973–1976) यांनी बँकेच्या विस्तार आणि ग्रामीण भागातील सेवांवर भर दिला.

१९७९–१९८३ पर्यंत एन. एम. दलवी आणि १९८३–१९८५ पर्यंत बी. डी. कदम यांचे नेतृत्व बँकेच्या व्यवस्थापकीय कार्यक्षमतेला वाणिज्यिक स्थिरता प्रदान करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले. १९८५–१९९१ दरम्यान चंद्रकांत देशमुख यांचा कार्यकाळ बँकेच्या सामाजिक बांधिलकीवर आणि सहकारी संस्थांच्या सशक्तीकरणावर लक्ष केंद्रित करणारा होता. १९९१–१९९७ पर्यंत रघुनाथ शंकर पाटील यांनी बँकेच्या धोरणात्मक वाढीला चालना दिली, आणि भाई जयंत पाटील यांचा कार्यकाळ गेल्या २८ वर्षांपासून सुरू असून, त्यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली बँकेने राज्यातील सहकारी बँकिंगमध्ये प्रसिद्धी आणि विश्वासार्हता मिळवली आहे. या सर्व चेअरमनांच्या योगदानामुळे बँकेने सुरक्षित, विश्वासार्ह आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारी संस्था म्हणून आपले स्थान कायम राखले आहे.

व्यवस्थापकीय स्थिरता

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापनात कार्यक्षम आणि दूरदृष्टीने नेतृत्व असलेले अधिकारी महत्त्वपूर्ण ठरले आहेत. सुरुवातीस द. दी. तोतडे (1961–1965) आणि व. त्र्यं. अग्निहोत्री (1965–1968) यांनी बँकेच्या प्रारंभिक संस्थात्मक स्थिरतेस हातभार लावला. प. वी. म्हात्रे (1968–1988) यांचा दीर्घकालीन कार्यकाळ बँकेच्या धोरणात्मक विकासासाठी आणि ग्रामीण भागातील सेवा विस्तारासाठी निर्णायक ठरला. त्यानंतर ए. डी. निपाणीकर, व्ही. ए. देवरे, एस. व्ही. पाटील, व्ही. एस. शिंदे, ए. डी. कारभारी, डी. बी. खोत, ए. के. जोशी, आर. एम. पाटील यांनी विविध काळात बँकेच्या व्यवस्थापकीय क्षमता, पारदर्शकता आणि आर्थिक स्थिरता सुनिश्चित केली. २००७ पासून प्रदीप नाईक यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बँकेला आधुनिक तंत्रज्ञान, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि कर्ज व्यवस्थापनात उंचावले तसेच बँकेच्या प्रतिमेला अधिक व्यापकरूप दिले, तर मे 2022 पासून व्यवस्थापनातील शिकवणुकीप्रमाणे हा गौरवशाली उत्कृष्ट वारसा जपून , बँकेच्या धोरणात्मक विस्तारास गती देण्याचे काम माझ्याद्वारे सुरू असून बँकेचा विश्वासार्ह आणि प्रगतिशील चेहरा राज्यात आणि देशात कायम ठेवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. अर्थात याचे संपूर्ण श्रेय अध्यक्ष मा.आमदार जयंत पाटील आणि सर्व सन्मानिय संचालक मंडळ यांना जाते. बँकेचे सर्व अधिकारी, व्यवस्थापकीय नेतृत्वामुळे बॅंकेने सुदृढ, पारदर्शक आणि विश्वास मिळवणारी संस्था म्हणून आपले स्थान राखले आहे असा माझा ठाम विश्वास आहे.

आधुनिकता

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तंत्रज्ञान स्वीकारताना सहकारी बँकिंग क्षेत्रात नवे मानदंड प्रस्थापित केले आहेत. २००० साली संपूर्ण शाखा स्वयंचलन (Total Branch Automation) सुरू करून सर्व शाखांमध्ये व्यवहार पूर्णपणे ऑटोमेट केले गेले, आणि २००८ मध्ये कोअर बँकिंग प्रणाली (CBS) अंमलात आणल्यामुळे शाखांचे व्यवहार केंद्रीकृत आणि सुसंगत झाले. स्वतःच्या डेटा केंद्र (Data Center) मुळे डेटा सुरक्षा आणि सातत्यपूर्ण व्यवस्थापन सुनिश्चित झाले. शेतकऱ्यांसाठी बँकेचा एक उल्लेखनीय उपक्रम म्हणजे २०१३ साली देशातील पहिलं के.सी.सी. डेबिट कार्ड (KCC Debit Card) सुरू करणे, ज्यामुळे कर्जाची थेट उपलब्धता झाली आणि डिजिटल व्यवहार सोप्या पद्धतीने करता आले. त्याचबरोबर एटीएम सेंटर्स, क्यू.आर. कोड पेमेंट, आय.एम.पी.एस., नेफ्ट, आर.टी.जी.एस. आणि इतर आधुनिक डिजिटल सेवा ग्रामीण आणि शहरी ग्राहकांना पोहोचवल्या गेल्या. संस्थाचे संगणकीकरण करणारी देशातील पहिली बँक होण्याचा बहुमान देखील २०२४ साली बँकेने मिळविला आहे.पण याच सोबतीला सायबर सेक्युरिटी वर बँकेने प्रचंड मेहनत घेतलेली पाहायला मिळते ज्यामुळे सहकार क्षेत्रातील विश्वास वाढला आहे. सलग पंधरा वर्षांहून शून्य टक्के एन.पी.ए. सातत्यपूर्ण नफा, ISO 9001:2015 प्रमाणपत्र आणि राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार हे तिच्या विश्वासार्हतेचे स्पष्ट प्रतीक आहेत. मात्र, फक्त आकडेवारीतली वाढ नव्हे, तर पारदर्शक कारभार, शाश्वत व्यवस्थापन, ग्राहकाभिमुख धोरणे आणि समाजाभिमुख उपक्रम यांमुळे रायगड बँक सहकाराचे खरे प्रतीक ठरली आहे.

बँकेने तंत्रज्ञानाचा अवलंब करून सुधारणा करण्यास नेहमीच कटिबद्ध राहिले आहे. त्यामुळे केवळ व्यवसायिक प्रगती नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला सशक्त आधार आणि शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासही बँकेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रायगड बँकेच्या ६५ वर्षांच्या गौरवमयी प्रवासात बँकेचे चेअरमन भाई जयंत पाटील यांचे नेतृत्व , संचालकांची सकारात्मक भूमिका, व्यवस्थापन, अधिकारी, आजी माजी कर्मचारी आणि ग्राहक यांच्या सामूहिक योगदानामुळे ही संस्था आजही विश्वासार्हता, प्रगती आणि सहकाराचे प्रतीक म्हणून उभी आहे.

सामाजिक बांधिलकी 

बँकेने बचतगट चळवळीच्या माध्यमातून २ लाखांहून अधिक महिलांना आर्थिक स्वावलंबनाकडे नेण्याचे कार्य केले आहे. पारंपरिक पापड, लोणच्यापासून सुरुवात करून या महिलांनी ट्रक, जेसीबी चालवण्यापर्यंत आपली धाडसपूर्ण क्षमता सिद्ध केली आहे. कोविड काळात त्यांनी पिपीई किट, मास्क व इतर आवश्यक वस्तू तयार करून अर्थार्जन केले. या उपक्रमांनी ग्रामीण समाजातील स्त्रीशक्तीला उभारी दिली आणि महिलांना आर्थिक निर्णयक्षम बनवण्यास महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यासोबतीला बँकेने लायन्स हेल्थ फाउंडेशनला प्रवासी ने-आण करण्यासाठी अम्ब्युलंस पुरविलीली असून मुख्यमंत्री सहायता निधि असो वा जिल्हा आपत्ति व्यवस्थापन यांच्याकरिता बँकेने सढळ हस्ते मदत केली आहे. जिल्ह्यातील अनेक मंडळांना खेळ,सांस्कृतिक कार्यक्रम यांच्याकरिता देखील बँकेने आर्थिक सहकार्य केले आहे. जिल्ह्यातील अनेक उपक्रमांना बँकेचे केवळ आर्थिक स्वरूपातच नव्हे तर सर्व बाजूने सहकार्य बँकेच्या वतीने होत असते.

प्रेरणादायी धडा

जेव्हा देशातील अनेक बँका वाढत्या एन.पी.ए., गैरव्यवस्थापन आणि तांत्रिक मागेपणामुळे अडचणीत आहेत, तेव्हा रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दाखवून दिले आहे की – दूरदृष्टी असलेले नेतृत्व, अभ्यासू अधिकारी, झोकून देणारे कर्मचारी आणि सहकारभाव यांमुळे कोणतीही सहकारी संस्था राष्ट्रीयकृत बँकांशीही खांद्याला खांदा लावून स्पर्धा करू शकते. ६५ वर्षांचा हा प्रवास फक्त बँकेचा नाही, तर ग्रामीण समाज, शेतकरी, महिला, छोटे-मोठे व्यवसायिक, ग्राहक आणि कर्मचाऱ्यांनी मिळून उभारलेली सामूहिक विजयगाथा आहे. अर्थात हा प्रवास करताना राज्यातीलच नव्हे तर देशातील एक आदर्शवत जिल्हा सहकारी बँकेचा प्रवास साध्य करण्यासाठी जिल्ह्यातील तसेच राज्यातील ग्राहकांनी दाखविलेला विश्वास आणि बँकेला जयंत पाटील यांचे लाभलेले धाडसी नेतृत्व यामुळे शक्य झाले आहे.

बँकेने ६७०० कोटींचा व्यवसाय टप्पा पूर्ण केलेला असून पुढील २ वर्षात बँक १०,००० कोटींहून अधिक व्यवसाय, १००० कोटींपेक्षा अधिकचा स्वनिधी साधण्याचे स्वप्न पूर्ण करत, सर्वाधिक ग्राहकांना जोडून आधुनिक, डिजिटल आणि पारदर्शक सेवा देण्यास कटिबद्ध आहे. या ध्येयाद्वारे बँक ग्रामीण अर्थव्यवस्थेचा सशक्त आधार निर्माण करण्यासाठी आणि प्रत्येक ग्राहकाच्या आर्थिक आत्मविश्वासाला प्रोत्साहन देण्यास बँक सतत प्रयत्नशील राहील.

मंदार वर्तक, मुख्य कार्यकारी अधिकारी

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक