मुदत ठेवीच्या नावावर करोडोची फसवणूक, साखरी गावातील घटना

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351

राजुरा, 28 ऑक्टोबर, बँक ऑफ इंडियाच्या वनसडी शाखेत नवीन योजना आली असून, यात मुदत ठेव केल्यास जास्त प्रमाणात मासिक व्याज मिळणार असल्याची बतावणी करीत तालुक्यातील साखरी गावातील नागरिकांना आरोपी युवकाने करोडो रुपयात फसविल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या विरोधात काही नागरिकांनी राजुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

साखरी येथे वेकोलिचा पोवनी-2 व पोवनी-3 प्रकल्प आला. या प्रकल्पात अनेकांच्या जमिनी वेकोलिने अधिग्रहित केल्या. त्याच्या मोबदल्यात अनेकांना करोडो रुपये मिळाले. काहींनी मिळालेल्या राशीची योग्य गुंतवणूक केली, तर बहुतांश नागरिकांनी रक्कम बँकेत ठेवली. अशातच साखरी येथील आरोेपी युवक एका कंपनीचा विमा काढण्याचे काम करीत होता. या युवकाने गावातील काही नागरिकांना गळाशी धरून नवीन योजना आणली असून या योजनेत मुदत ठेव केल्यास जास्त प्रमाणात महिन्याला नगद स्वरूपात व्याज मिळणार व केव्हाही रक्कम उचल करता येते, अशी बतावणी केली. खात्री बसविण्यासाठी त्याने सुरुवातीला दोन-तीन महिने दर महिन्याला वाढीव व्याजाची रक्कम नगदी दिली. महिन्याला जास्त व्याज मिळत असल्याच्या आमिषाला बळी पडत काहींनी स्वतःच्या नावे, तर काहींनी आपल्या परिवारातील सदस्यांच्या नावाने मुदत ठेव करण्यासाठी दूसर्‍या बँकेतून रक्कम उचलली व या युवकाकडे दिली.

त्या युवकाने मुदत ठेव करणार्‍याच्या नावाने नविन खाते काढून त्या खात्यावर मुदत ठेव केल्याच्या बँकेच्या शिक्का मारलेल्या पावत्या आणून नागरिकांना दिल्या. सांगितल्याप्रमाणे नागरिकांना दोन-तीन महिने व्याज तो स्वतः आणून देत होता. त्यानंतर तो युवक आत्महत्या करतो म्हणून घर सोडून निघून गेला. तेव्हा काही नागरिकांना संशय आल्याने त्यांनी बँकेत चौकशी केली असता दिलेल्या पावत्या खोट्या असल्याचे त्यांना समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नागरिकांनी नितेश याला रक्कम परत मागितली असता माझ्याकडे पैसे नाही, तुम्हाला काय करायचे ते करून घ्या, अशाप्रकारचे उत्तर तो देऊ लागला. त्यामुळे नागरिकांना मोठा धक्का बसला. 

तक्रारींची चौकशी करण्यात येईल : संतोष दरेकर

एक दोन नागरिकांच्या तक्रारी आल्या आहे. आणखी काही तक्रारी येण्याची शक्यता आहे. या सर्व तक्रारींची चौकशी करण्यात येईल झालेल्या चौकशीचा अहवाल बनवून समोरील कारवाईकरिता वरिष्ठांकडे पाठविणार आहोत, असे राजुरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष दरेकर यांनी सांगितले.  

या प्रकरणात साखरी या गावातील जवळपास 10 ते 12 नागरिकांची फसवणूक झाली असून, काही बाहेरचे नागरिकसुध्दा या आमिषाला बळी पडल्याचे सांगण्यात येत आहे. जास्त प्रमाणात व्याज मिळणार म्हणून काहींनी 5 लाख, 10 लाख, तर काहींनी 20 लाखापर्यंतची रक्कम मुदत ठेव म्हणून जमा केली आहे. हा आकडा पुन्हा समोर वाढण्याची शक्यता असून नागरिक राजुरा पोलिस ठाण्यात तक्रारी देत आहे. फसवणूक करणार्‍या आरोपीला पकडून कडक शिक्षा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here