सॅटर्डे नाईट पार्टीवर डीसीपीचा छापा; शंभरावर मुले – मुली आढळल्या.
नागपूर :- सीताबर्डी तसेच अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दोन वेगवेगळ्या लाउंजमध्ये सॅटर्डे नाइट पार्टीच्या नावाखाली धांगडधिंगा सुरू असल्याचे कळल्याने परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त विनिता शाहू यांनी शनिवारी मध्यरात्री तेथे धडक दिली. या दोन्ही ठिकाणी मर्यादेपेक्षा जास्त गर्दी आढळून आली आणि दोन्ही ठिकाणचे संचालक वेळेचे भान न ठेवता वेगवेगळे खाद्यपदार्थ आणि पेय उपलब्ध करून देत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.
सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाब्लो लाउंज आहे तर बॅरल अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. या दोन्ही ठिकाणी तरुणाईच्या उड्या पडतात. कोरोना संसर्गाचा धोका असताना पाब्लो आणि बॅरलच्या संचालकांनी सॅटर्डे नाइट पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीत सर्व प्रकारचे खाद्य तसेच पेय आणि डान्सिंग चोर फ्लोअर उपलब्ध करून दिला जात असल्याने अर्थात खाओ, पीओ, मजा करो असे या पार्टीचे स्वरूप असल्याने मोठ्या प्रमाणात तेथे तरुणांनी गर्दी केली होती. डांसच्या नावाखाली धांगडधिंगा सुरू झाल्याची तक्रार मिळाल्यामुळे उपायुक्त विनिता शाहू यांनी स्वतःच क्रमशः या दोन्ही ठिकाणी धडक दिली. दोन्ही ठिकाणी ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा तरुण-तरुणींची संख्या कितीतरी जास्त होती. सोशल आणि फिजिकल डिस्टनसिंगचा फज्जा उडवून डान्स सुरू होता. शिवाय संचालकांना ठरवून दिलेली वेळ संपूनही दोन्ही ठिकाणी पार्टी सुरू होती. ते पाहून उपायुक्त शाहू यांनी लगेच सीताबर्डी आणि अंबाझरी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून त्यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार दोन्ही पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी अनुक्रमे पाबलो आणि बॅरलच्या संचालकांविरुद्ध मध्यरात्री कारवाईची प्रक्रिया सुरू केली.
रंगाचा भंग झाल्याने धावपळ
नाईट पार्टी रंगात आल्यानंतर अचानक पोलीस धडकल्याने रंगात भंग पडला. कारवाईच्या भीतीमुळे टूनन असलेल्या अनेकांनी आरडाओरड करीत पळून जाण्याचा प्रयत्न केला.