कविता: वाघ – मानव संघर्ष

 

काय आणता विदेशी चित्ते

आपले स्वदेशी वाघ आवरा 

भक्ष ठरताहे ग्रामीण जनता

आधी तयांचे जीवन सावरा !

 

दररोज जावं लागते शेतात

किंवा कामासाठी रानात 

घालतो कसा अलगद झेप

काहीच येत नाही ध्यानात!

 

शेतामधून माणूस पळविला

रानात वाघाने खाल्ली बाई

पेपरातही बातमीवर बातमी

रोज वाळत नाही शाई !

 

आता तर हद्दच झाली

त्यांनी गावाकडे वळवला मोर्चा

जीव आपण कसा वाचवायचा

खेडोपाडी एकच चर्चा!

 

कोंबड्या नेल्या, बक-या खाल्ल्या,

कधी कुत्रा, बैल, म्हैस, गाय

आता हे रोजचेच झाले

यावर सरकारी उपाय काय?

 

खेळत असताना पोरगा उचलला,

कामावरून येतांना माणूस नेला

“कायदा हातात घ्यायचा नाय,

राष्ट्रीय संपत्ती, कुणी मारु नका वाघाला”!

 

इकडे पकडणे, तिकडे नेऊन सोडणे,

सरकारी काम झाला नित्याचा 

दहा-विस हजार मोबदला देत

सौदा होतो जणू पिडीत कुटुंबाचा!

 

असेल खरी हिम्मत 

तर उचला इथले सारे वाघ

घेऊन जा गूजरातला, 

नाहीतर सजवा राणीचा बाग!

 

वाढवा तूमचे प्रकल्प पर्यटन, 

करा खुशाल सौंदर्यीकरण

शांत, स्थिर, भयमुक्त

हवे आम्हा सुरक्षित जनजीवन!

 

    – पी.डी.काटकर “माणिक पुत्र”

     मो :8806515849

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here