फटाके कुणाला आवडत नाही…
सिद्धांत: फटाके कुणाला नाही आवडत. फटाक्यांचे विविध प्रकार आणि ते फोडल्यानंतर बाहेर पडणारे विविधरंगी प्रकाश लहान थोर सगळ्यांनाच आकर्षित करतात. पण एकेकाळी उत्सव आणि उत्सवाचे प्रतीक असलेले फटाके आता दुधारी तलवार बनले आहेत. हे फटाके आपले डोळे दीपवून टाकतात पण त्याचवेळी आपल्या पर्यावरणाचा आणि आरोग्याचा नाश करतात.
संपूर्ण भारतभरातील लोक दिवाळीच्या वेळी मोठ्या प्रमाणात फटाके फोडतात. या काळात वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढते. याव्यतिरिक्त, विवाहसोहळा आणि इतर उत्सव कार्यक्रम फटाके मोठ्या प्रमाणावर वाजवले जातात. क्रिकेट सामने, उत्पादनांचे लाँचिंग आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अनेकदा फटाके वाजवले जातात. या स्फोटक प्रदर्शनांमधून आनंद व्यक्त करणे ही परंपराच बनली आहे, पण कशासाठी?
फटाके हवेत विषारी वायू सोडतात, त्यामुळे हवेची गुणवत्ता खराब होते. फटाक्यांमधील रसायने—जसे की सल्फर, कार्बन आणि धातूचे कण—वातावरण दूषित करतात, ज्यामुळे धुके आणि श्वसनाच्या समस्या निर्माण होतात.फटाक्यांचा दुष्परिणाम हा पर्यावरणाच्या पलीकडे इतर अनेक घटकांवर होतो. फटाक्यांमुळे श्वसनाचे विकार, हार्मोनल असंतुल होऊ शकते. फटाक्यांचे कर्णकर्कश आवाज झोपण्याच्या पद्धतींमध्ये व्यत्यय आणतात. त्यामुळे पॅनीक अटॅक सारख्या समस्या किंवा मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. खासकरून लहान मुले आणि जेष्ठ नागरिक यांना यांचा जास्त त्रास होतो. पक्षी आणि प्राणी यांना त्यांच्या संवेदनशील श्रवणामुळे फटाक्यांच्या आवाजाचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
https://mediavartanews.com/2023/11/30/price-of-wars-in-the-world/
सुप्रीम कोर्टाचे म्हणणे आहे की फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या बाबतीत लोकांना संवेदनशील बनवणे महत्वाचे आहे. आपल्या कृतींचे भीषण परिणाम काय होतील? हे आपण ओळखले पाहिजे. फटाक्यांचा वापर मर्यादित करून आपण आपल्या पर्यावरणाचे रक्षण आणि जीवनाचे रक्षण आपण करू शकतो. फटाके क्षणार्धात चमकू शकतात, परंतु त्यांचे आपल्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर दीर्घकाळ टिकणारे धोकादायक ठरणारे परिणाम घडवतात.
पण याचा अर्थ असा नव्हे की, दिवाळीच साजरी करू नये. फटाके अजिबातच फोडू नये. शेवटी फटाके फोडणे म्हणजे आपला आनंद साजरा करण्याचे एक साधन आहे. आनंद साजरा करणे आणि प्रदूषण होणार नाही याची काळजी घेणे याचा आपल्याला ताळमेळ साधावा लागेल. प्रदूषणविरहित, जास्त धूर व आवाज न करणारे फटाक्यांचा वापर करणे, रात्री अपरात्री फटाके फोडणे आणि सर्वात महत्वाचे मर्यादित प्रमाणात फटाके फोडणे यांसारख्या उपाय योजना आपल्याला राबवाव्या लागतील.