संविधान म्हणजे काय…?
सिद्धांत: काल देशभर संविधान दीन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशासनाकडून विविध सामाजिक संस्थांकडून संविधान दीन साजरा करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. राजकारणी, पोलिस दल आणि सर्वसामान्य नागरिकांनी या कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी झाले. या कार्यक्रमांचे हजारो फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. पण हे सगळे करताना संविधानाचा योग्य वेळी, योग्य प्रकारे वापर केला जातो का? याबाबत नागरिकांनी विचार केला का?
संविधान म्हणजे एक आदर्श समाजामध्ये शांती आणि सुव्यवस्था कायम राहावी आणि नियम मोडणाऱ्याना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेले एक गाइडबुक आहे. यामध्ये आपल्याला काही हक्क दिले आहेत. समानतेने जगण्याचा हक्क, शिक्षणाचा हक्क, सरकारकडून मुलभूत सोयीसुविधा सुलभपणे मिळवण्याचा हक्क. पण आजही हे हक्क भारतातील सर्वच नागरिकांना उपलब्ध आहेत का? भारतातील उपासमारी वर्षोनुवर्षे वाढतच आहे. अशावेळी नागरिकांना स्वस्त आणि परवडणाऱ्या दरात अन्न धान्य उपलब्ध होत आहे का? रेशनधान्य वाटपामध्ये अनेक घोटाळे समोर येत असतात. अश्या लोकांना पण संविधानात नमूद केलेल्या कायद्या अंतर्गत योग्य शिक्षा केली जाते का? आपल्या आसपासची परिस्थिती बघितल्यावर या प्रश्नांचे उत्तर मिळते.
संविधानाने भारतीयांना धर्माचे, राहणीमानाचे स्वातंत्र्य दिले आहे. पण देशातील आजची राजकीय परिस्थीती संविधानाने घालून दिलेल्या नियमांनुसार योग्य आहे का? दुर्दैवाने नाही असेच म्हणावे लागेल. धर्मनिरपेक्ष असणाऱ्या आपल्या भारत देशात आज साऱ्या गोष्टी धर्माच्या नजरेतून पहिल्या जात आहे. राजकारण हिंदू मुस्लिम समाजामध्ये द्वेष निर्माण करून पुढे आणले जात आहे. या द्वेषक राजकारणामुळे समाजातील विविध घटकांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष पसरत असून परिस्थिती स्फोटक बनत आहे, अशी परिस्थिती निर्माण करण्याविरोधात संविधानामध्ये अनेक कठोर कायदे नमूद केले आहेत, पण प्रशासन या कायद्याचा योग्य वापर केला जातो का? विचार करून बघा.
बघायला गेले तर संविधानातील कायदे सगळ्यांसाठी समान असतात. पण देशभरात हजारो गुन्हे घडतात, महिलांवर अत्याचाराच्या घटना घडतात. काही आरोपी पकडले जातात, काही आरोपी अचानक गायब होतात. गरीब, मागासलेल्या घटकातील आरोपीसाठी कायदे वेगळ्याप्रकारे राबवले जातात, आणि काही आरोपीना कायदे वेगळ्याप्रकारे राबवले जातात. यावेळी तुमचे नाव काय आहे? धर्म काय आहे? तुम्ही कोणाला ओळखता यावरून तुम्हाला कायदे लागू होतात? मग अशावेळी काही नागरिकांकडून या परिस्थितीचा दोष थेट संविधानाला दिला जातो. मग मागणी होते? की संविधान जुने झाले, संविधान बदला…
संविधानामध्ये दिलेले कायदे कितीही योग्य असतील, अचूक असतील…पण या कायद्याची अंमलबजावणी करणारेच आपल्या मर्जीप्रमाणे या कायदे वळवत असतील, त्यातून पळवाटा शोधत असतील तर ते कायदे चुकीचे नसून त्याचे अंमलबजावणी करणारे आपण चुकीचे आहोत.
मग आपण बदलणार आहोत का? संविधानाने दिलेले हक्क आणि कर्तव्यांचा योग्य वापर करणार आहेत का? संविधानाने आखून दिलेल्या कायद्यांअंतर्गत प्रशासन काम करते का, यावर जबाबदार नागरिक म्हणून आपण लक्ष ठेवणार आहोत का? की घटना बदलली पाहिजे अशा वायफळ बाता मारत दुसरीकडे संविधान दीन साजरा करणार आहोत?