एड्सला रोखण्यासाठी विद्यार्थ्यांमार्फत जागरुकता
रेड रिबन क्लबमार्फत जनजागृती
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग : एड्स संसर्गाचे प्रमाण जिल्ह्यामध्ये शुन्य टक्के आणण्यासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे रेड रिबन क्लब सुरु करून एक वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. या क्लबद्वारे विद्यार्थ्यांच्या मदतीने एड्सबद्दल जनजागृती केली जात आहे. वेगवेगळे समाजोपयोगी कार्यक्रम घेऊन त्याचा व्यापक प्रचार करण्याचे काम या क्लबमार्फत होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
जिल्ह्यात नागरिकीकरण झपाट्याने वाढत आहे. वेगवेगळ्या भागातून जिल्ह्यात येणार्यांची संख्यादेखील वाढू लागली आहे. जिल्ह्यात राहणीमानातदेखील बदल होऊ लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये एड्सचे रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. एड्सला रोखण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. जिल्हा रुग्णालयात जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग कार्यरत असून जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक यांच्या नेतृत्वाखाली ही यंत्रणा काम करीत आहे.
जिल्ह्यात एचआयव्ही प्रतिबंध व नियंत्रणासाठी वेगवेगळ्या सेवा कार्यरत आहेत. एचआयव्ही समुपदेशन व चाचणी करण्यासाठी 15 आयसीटीसी केंद्र आहेत. या केंद्रामध्ये प्रशिक्षित समुपदेशक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहेत. 74 एफआयसीटीसी केंद्रे आहेत. तपासणीच्या दरम्यान एचआयव्ही बाधित रुग्ण आढळून आल्यास आयसीटीसी केंद्रामार्फत एचआयव्ही समुपदेशन, विशेषतः व्यक्तीच्या वर्तनामध्ये बदल घडून आणण्यासाठी प्रबोधन केले जाते. औषधोपचार, मानसिक आधार देण्याचे काम केले जाते.
2014 पासून ऑक्टोबर 2024 पर्यंत 11 लाख 31 हजार 855 तीन हजार 809 एचआयव्ही बाधित आढळून आले आहेत. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात एचआयव्ही समुपदेशन व चाचणी केली जात आहे. गेल्या 10 वर्षाच्या तुलनेत एड्स संसर्गाचे प्रमाण 0.3 टक्के खाली आले आहे. हे प्रमाण शुन्य टक्केपर्यंत आणण्यासाठी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची मदत घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील 24 महाविद्यालयात रेड रिबन क्लब स्थापन करण्यात आले आहेत. प्रत्येक क्लबमध्ये 12 याप्रमाणे 288 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या क्लबद्वारे विद्यार्थ्यांच्या मदतीने कार्यशाळा घेऊन एड्सबद्दल जनजागृती केली जात आहे. रक्तदान, रक्तदाता युवा दिन सारखे उपक्रम राबवून जिल्ह्यात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभागाकडून देण्यात आली.
एड्स नियंत्रणासाठी जिल्ह्यात वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहे. एड्स शुन्यावर आणण्यासाठी जिल्ह्यातील 24 महाविद्यालयात रेड रिबन क्लब स्थापन केले आहेत. या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मदतीने वेगवेगळे दिवस साजरे करून जनजागृती केली जाते. तरुण पिढीसह ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
– संजय माने, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक,
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष