अलिबाग मधील सीएनजी पंप ठरतोय डोकेदुखी

121
अलिबाग मधील सीएनजी पंप ठरतोय डोकेदुखी

अलिबाग मधील
सीएनजी पंप ठरतोय डोकेदुखी

अलिबाग मधील सीएनजी पंप ठरतोय डोकेदुखी

वाहतूक कोंडीमुळे नागरिकांमध्ये संताप

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग : अलिबाग आगारातील एसटी बससाठी सीएनपी पंप सुरु करण्यात आला. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी हा पंप उभारल्याने येणार्‍या-जाणार्‍या चालकांसह प्रवासी व नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. खासगी वाहनांची या पंपावर खूप गर्दी होत असल्याने महावीर चौक ते एसटी स्थानकाजवळील प्रवेशद्वाराजवळ वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. सीएनपी पंप चालकांच्या या मनमानी कारभाराचा फटका अलिबागकरांना बसत आहे.

धूर प्रदूषण रोखण्याबरोबरच उत्पन्नवाढीसाठी डिझेलऐवजी सीएनजीवर चालणार्‍या एसटी बस सुरु करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला. अलिबाग स्थानकात गेल्या वर्षभरापासून सीएनपी पंपाचे काम सुरु होते. गेल्या पंधरा दिवसांपासून या सीएनजी पंप सुरु झाले आहे. एसटी बसबरोबरच खासगी वाहनांमध्ये सीएनपी गॅस भरण्याचे काम या पंपाद्वारे केले जाते. खासगी वाहनांमध्ये गॅस भरण्यासाठी बाहेरून मार्ग काढण्यात आला आहे. या मार्गावर लहान-मोठी दुकाने असून, घरत आळी व छत्रपती शिवाजी चौक, जुनी बाजारपेठ या ठिकाणी जाण्याचा मार्ग आहे. त्यामुळे हा भाग कायमच वर्दळीचा राहिला आहे. गणेशोत्सव व दिवाळीत या परिसरात खरेदीसाठी मोठी गर्दी होते. त्यामुळे सणासुदीच्या काळात या मार्गावरील वाहतूक अनेक वेळा बंद केली जाते. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. मात्र, शहरात सुरु असलेल्या सीएनपी पंप चालकाच्या नियोजनाअभावी या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होऊ लागली आहे. सीएनपी गॅस भरण्यासाठी खासगी वाहनांच्या रांगाच रांग लागत आहे. त्यामुळे महावीर चौक या परिसरात वाहतूक कोंडी होते. ही कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची दमछाक उडत आहे. वाहतूक पोलीस गेल्यावर पुन्हा जैसे थे अशी परिस्थिती निर्माण होत आहे. सीएनजी पंप चालकाने त्यांच्या पंपावर खासगी सुरक्षा रक्षक ठेवला आहे. परंतु, त्यांच्याकडूनही योग्य ती खबरदारी घेतली जात नाही. सीएनजी पंप चालकांच्या या मनमानी कारभारामुळे अलिबागमधील नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी योग्य ती अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

नगरपरिषद प्रशासनाची दुटप्पी भूमिका
महावीर चौकपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक हा भाग कायमच गजबजलेला राहिला आहे. या भागातील रस्त्याच्या दुतर्फा कोपर्‍यामध्ये स्थानिक भाजी विक्रेत्या रानभाजी, बोरं, इतर फळे विकून त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवित आहेत. नगरपरिषदेकडून त्यांच्याकडून पावत्या फाडल्या जातात. या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी भाजी विक्रेत्यावर अनेक वेळा कारवाईदेखील नगरपरिषदेने केली आहे. परंतु, सीएनपी पंप सुरु झाल्याने भाजी विक्रेत्यांना उठविण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर सीएनजी गॅस भरणार्‍या वाहनांची रांग दिसून येत आहे. त्यामुळे एकाला एक आणि दुसर्‍या वेगळा न्याय या भूमिकेमुळे भाजी विक्रेत्या महिलांच्या व्यवसायावर गदा आली आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेबाबत नाराजीचे सूर उमटत आहेत.
सीएनजी पंपामुळे महावीर चौक परिसरात वाहतूक कोंडी होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जाईल.

– किशोर साळे, पोलीस निरीक्षक, अलिबाग