Home E-Paper विद्यार्थ्यांचा प्रशासनाशी प्रत्यक्ष संवाद — ‘चला कार्यालय बघूया’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी घेतली भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
भरत पुंजारा
पालघर तालुका प्रतिनिधी
मो.९९२३८२४४०७
पालघर: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार यांच्या वतीने सर्व शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेला “चला कार्यालय बघूया” हा अभिनव उपक्रम सध्या अत्यंत यशस्वीपणे आणि उत्साहात सुरू आहे. शासन व्यवस्था, प्रशासकीय पद्धती आणि विविध विभागांचे कार्य प्रत्यक्ष अनुभवण्याची सुवर्णसंधी विद्यार्थ्यांना मिळत असल्याने या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह शिक्षकांकडूनही मोठा प्रतिसाद लाभत आहे.
या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी प्रत्यक्ष भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पांदरम्यान त्यांनी प्रशासकीय यंत्रणा कशा प्रकारे कार्य करते, शासन निर्णयांची अंमलबजावणी कशी होते तसेच विकासकामांबाबतची प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला.
प्रकल्पाच्या धोरणांनुसार प्रत्येक शाळेला निश्चित दिनांक देण्यात आला असून त्या दिवशी शाळेतील विद्यार्थी प्रकल्प कार्यालयाला भेट देतात. या दौऱ्यात विद्यार्थी —
कार्यालयातील विविध विभागांचे कामकाज
नोंदी व कागदपत्रांची प्रक्रिया
प्रशासकीय निर्णय आणि अंमलबजावणी
नागरिक सुविधा व्यवस्थापन
यांचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत.
भेटीदरम्यान विद्यार्थी स्वतःच्या शाळेशी संबंधित समस्या, सुविधा आवश्यकता आणि विविध सुधारणा विषयक मुद्दे थेट प्रकल्प अधिकाऱ्यांसमोर मांडतात. त्यामुळे शाळांमधील वास्तव स्थिती प्रशासनाला अधिक स्पष्टपणे समजते असून उपाययोजना करण्याचा वेग आणि कार्यक्षमता वाढत आहे, असे प्रकल्प प्रशासनाने स्पष्ट केले.
हा उपक्रम केवळ प्रकल्प कार्यालयापुरता मर्यादित न ठेवता, विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन व इतर महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांनाही भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे शासन यंत्रणेतील विविध विभागांची जबाबदारी, कार्यप्रणाली आणि जनतेशी असलेले नाते विद्यार्थ्यांना जवळून समजत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन व्यापक होऊन प्रशासनाबद्दल माहिती, विश्वास व जागरूकता वाढत आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वास्तवदर्शी शिक्षण मिळत असल्याचे जव्हार प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी सांगितले. त्यांनी पुढे म्हटले —
“‘चला कार्यालय बघूया’ उपक्रम विद्यार्थ्यांना प्रशासनाची प्रत्यक्ष व सखोल ओळख करून देणारा आहे. त्यांच्या भविष्यातील करिअर नियोजन व वैयक्तिक विकासासाठी हा अनुभव निश्चितच प्रेरणादायी व सकारात्मक ठरणार आहे.”
आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा, उत्सुकता निर्माण करणारा आणि शासन व्यवस्थेबद्दल आत्मीयता वाढविणारा हा उपक्रम शिक्षण क्षेत्रातील एक नाविन्यपूर्ण व यशस्वी पाऊल म्हणून सर्व स्तरांतून प्रशंसनीय ठरत आहे.