चौल दत्त मंदिरातील चोरीचा तपास लागेना

45

चौल दत्त मंदिरातील चोरीचा तपास लागेना

चार वर्षांनंतरही चोरटे मोकाटच; पोलिसांच्या तपासाबाबत भक्तांकडून नाराजी

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:-अलिबाग तालुक्यातील चौल-भोवाळे येथील पर्वतनिवासी दत्त मंदिरामध्ये अज्ञात चोरट्यांनी 17 डिसेंबर 2022 रोजी चोरी करुन मूर्तींच्या मागे लावलेली सुमारे 40 किलो चांदी लंपास केली होती. 11 डिसेंबरला येथील यात्रा संपल्यानंतर ही चोरी झाली होती. या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, तपासासाठी रायगड जिल्हा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक तयार करण्यात आले आहे. परंतु, चार वर्षांचा कालावधी उलटूनही चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश आल्याने दत्तभक्तांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

रायगड जिल्ह्यातील मंदिरांतील दानपेट्या फोडून पैसे, देवाच्या चांदीच्या मूर्ती चोरीला गेल्याचे अनेक गुन्हे घडले आहेत. त्यातील काही चोऱ्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असले तरी तालुक्यातील प्रसिद्ध चौल-भोवाळे येथील दत्त मंदिरातील चोरीचा छडा अद्याप पोलिसांना लागलेला नाही. आरोपी सापडत नसल्याने पोलिसांनी तपास करण्याचे सोडून दिले की काय, अशी भावना दत्तभक्तांकडून व्यक्त करण्यात येत आहे. चौल मंदिरातील 40 किलो चांदी चोरीला गेल्याची घटनेला आता चार वर्षे होतील; परंतु, अद्याप तपास लागलेला नाही. यंदा चौल-भोवाळे येथील दत्तयात्रेला गुरुवार, दि. 4 डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर दत्त मंदिरातील चोरीच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.

चौल-भोवाळे येथील दत्त मंदिरात चार वर्षांपूर्वी चोरी झाली होती. या मंदिरातील तब्बल चाळीस किलो चांदीची प्रभावळ चोरीला गेली होती. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन चोरट्यांचे छायाचित्रण आढळून आले आहे. रेवदंडा पोलीस ठाण्यात चार वर्षांमध्ये तीन अधिकारी बदलून आले. परंतु, एकाही अधिकाऱ्याला या चोरीचा तपास करता आला नाही. सध्याचे प्रभारी अधिकारी श्रीकांत किरवले यांच्याशी संपर्क साधून तपासाबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
यावर्षी गुरुवार, दि. 4 डिसेंबरपासून दत्तयात्रेला प्रारंभ होत आहे. दरवर्षी या ठिकाणी पाच दिवसांची यात्रा भरते. जिल्ह्यासह राज्य-परराज्यातील अनेक व्यावसायिक या यात्रेत व्यवसायासाठी येत असतात. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. बाहेरुन येणाऱ्या अनोळखी व्यावसायिकांबरोबर सर्वच व्यावसायिकांची नोंदणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी आतापासूनच प्रभावी यंत्रणा राबविण्यात यावी, अशी मागणी दत्तभक्तांकडून होत आहे.

मंदिरात चोरी झाली तेव्हा रेवदंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे होते. त्यांनी ग्रामस्थांना चोरांचा छडा लावून लवकरच जेरबंद करू, असे ठाम आश्वासन दिले होते. परंतु, चार वर्षांनंतरही चोर पकडले गेलेले नाहीत. एकही धागा हाती लागलेला नाही. तपास आजही तिथेच अडकलेला आहे. तत्कालिन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभाग उतरला, स्पेशल पथक नेमले गेले, चौकशीचे ढोल बडवले गेले. मात्र, कुठलाही सुगावा नाही.

रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक म्हणून आंचल दलाल यांनी कारभार हाती घेतल्यापासून अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. तसेच, कामात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचाही त्यांनी चांगला बंदोबस्त केल्याचे समजते. त्यामुळे आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली दत्त मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्यांना पकडण्यासाठी आता तरी तपासाची चक्रे गतीने फिरतील, अशी तमाम दत्तभक्तांची आशा आहे.

आतापर्यंत चोर सापडणे गरजेचे होते, अशी माझ्यासह सर्वच दत्तभक्तांची भावना आहे. यामध्ये फक्त बाहेरचेच आहेत की आपल्याकडील कोण आहेत, हे कळायला तर हवेच. नुसता चोरीचा माल मिळणे महत्त्वाचे नाही, तर चोर पकडणे गरजेचे आहे.