पोयनाड येथील सुरभी ज्वेलर्स दरोडा प्रकरण
अलिबाग सत्र न्यायालयाने एकाच वेळी दहा आरोपींना सक्त मजूरीची शिक्षा…
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- पोयनाड येथील सुरभी ज्वेलर्सवर दरोडा प्रकरणातील दहा आरोपींना अलिबागच्या विशेष सत्र न्यायालयाने सक्त मजूरीची शिक्षा सुनावली, तसेच दंडही ठोठावला. पोयनाड येथील सुरभी ज्वेलर्सवर दि. २६ ऑगस्ट २०१५ रोजी रात्री ९ ही घटना घडली होती. आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून ८० लाख रुपये किमतीचे दागिने आणि ९ लाख रुपयांची रोकड पळवून नेली होती. या घटनेतील एका आरोपीला स्थानिकांनी पकडले होते. मात्र उर्वरीत आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले होते.
सुरवातीला पोयनाड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होती. मात्र नंतर रायगडच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक जितेंद्र व्हनकोटी, पोयनाड पोलीस ठाण्याचे प्रभारी राजमोहम्मद राजे आणि सायबर सेलचे प्रमोद बडाख यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून फरार झालेल्या १२ आरोपींपैकी १० आरोपींना अटक केली होती.
या प्रकरणाचा तपास करून पोलीसांनी अलिबाग येथील विशेष सत्र न्यायालयात या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी अलिबागच्या विशेष सत्र न्यायाधीश सुशीला तिवारी यांच्या समोर सुरू होती. ज्यात जिल्हा सरकारी अभियोक्ता म्हणून अँड. संतोष पवार यांनी काम पाहीले. सुनावणी दरम्यान एकूण ५५ साक्षी नोंदवण्यात आल्या. यात फिर्यादी, तपासिक अमंलदार, साक्षीदारांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सरकारी अभिव्योक्ता अँड संतोष पवार यांचा युक्तीवाद ग्राह्य धरला आणि न्यायालयाने दहा आरोपींना दोषी ठरवले.
यानुसार जिनाह उर्फ जे के नैनुद्दीन मोहम्मद लौबी(५५), इमराद इस्माईल मुजावर(३०) करणराम आशिष विश्वकर्मा(४०), बिलाल कासिम कुरेशी(२४), समीर भगवान पाटील(२३), प्रदिप उर्फ बबलू लक्ष्मण पाटील(२३), सनी उर्फ चैतन्य सुनील पाटील,(२९), बिपीन बाफना(३५) महम्मद अकबर कासिम, मुबीन सगीर शेख अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. भारतीय दंड संहितेतील विवीध कलमांतर्गत सर्वांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. या शिवाय दंडही ठोठावला आहे.