फुटबॉलचे अनभिषिक्त सम्राट पेले

64

फुटबॉलचे अनभिषिक्त सम्राट पेले

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो: ९९२२५४६२९५

केवळ फुटबॉलमध्येच नाही तर जागतिक क्रीडा क्षेत्रात जिवंतपणीच आख्यायिका बनलेले फुटबॉलचे महान खेळाडू, फुटबॉल सम्राट पेले यांचे गुरुवार दिनांक २९ ऑक्टोबर रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. फुटबॉल सम्राट पेले हे आतापर्यंतचे सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू आहेत. केवळ फुटबॉल खेळणाऱ्या खेळाडूंसाठीच नव्हे तर सर्वच खेळातील खेळाडूंसाठी देवासमान असलेले पेले यांचे मूळ नाव एड्सन आरंतेस दो नासिमेंतो असे होते मात्र पेले याच नावाने जग त्यांना ओळखत असे आणि त्यांनी हेच नाव अजरामर केले. 

२३ ऑक्टोबर १९४० रोजी ब्राझीलमधील ट्रेस कोराकोसा येथे एका गरीब कृष्णवर्णीय कुटुंबात जन्मलेल्या पेलेंना लहानपणापासून फुटबॉलची आवड होती. त्यांचे वडील डोंनींडि न्हो हे एका स्थानिक क्लब साठी फुटबॉल खेळायचे. पेले यांनी लहानपणीच आपल्या वडिलांचा खेळ पाहिला होता त्यामुळे त्यांनीही वडिलांप्रमाणेच फुटबॉल खेळण्याचा निश्चिय केला आणि लहान वयातच ते फुटबॉल गाजवू लागले. त्यांचे फुटबॉलमधील कौशल्य पाहून त्यांना वयाच्या १६ व्या वर्षीच सेंटोसा क्लबकडून खेळण्याची संधी मिळाली. हा क्लब ब्राझीलमधील नामांकित क्लब म्हणून ओळखला जातो. या क्लबमध्येच फुटबॉलच्या या हिऱ्याला पैलू पाडण्यात आले. या क्लबकडून पेले यांनी असे प्रदर्शन केले की वयाच्या १६ व्या वर्षीच त्यांचे जगभर नाव झाले. क्लब फुटबॉल गाजवल्याने लवकरच त्यांची ब्राझीलच्या मुख्य संघात निवड करण्यात आली. 

 

पेले हे नेहमी फॉरवर्डला खेळत असत. फॉरवर्डला खेळणाऱ्या पेलेंच्या पायाचे आणि गोलचे नातेच जुळले होते. त्यांच्या पायाशी फुटबॉल आला की त्याला दोन्ही पायांनी खेळवत हरिणाच्या चपळाईने प्रतिपक्षाचा बचाव भेदत त्याला गोलच्या चौकटीत पाठवून देत. पेले यांनी जेंव्हापासून ब्राझीलच्या राष्ट्रीय संघाकडून खेळायला सुरवात केली तेंव्हापासून ब्राझील ही फुटबॉलमधील महाशक्ती म्हणून उदयास आली. पेले यांच्यामुळेच ब्राझीलने १९५८, १९६२, १९७० असे तीन विश्वचषक जिंकले. या तिन्ही विश्वचषक स्पर्धेत पेले यांनी अद्वितीय कामगिरी केली. पेले यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. पेले यांनी खेळलेल्या ७७ आंतरराष्ट्रीय सामन्यात ९२ गोल केले आहेत. हा एक जागतिक विक्रम आहे, जो अजूनही कोणत्या खेळाडूला मोडता आला नाही. 

विश्वचषक स्पर्धेतही त्यांनी १४ गोल केले आहेत. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत एकूण ७७५ हुन अधिक गोल केले आहेत. सर्व प्रकारच्या फुटबॉल स्पर्धेत त्यांनी १२८१ गोल केले आहेत. त्यांच्या या कामगिरीची नोंद गिजीज बुक वर्ल्ड रेकॉर्डने देखील घेतली आहे. १९५७ साली आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण करणाऱ्या पेलेंनी आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना १९७७ सालीं खेळला. म्हणजे जवळपास २० वर्ष त्यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलवर हुकूमत गाजवली होती.

 दोन दशके फुटबॉलवर अधिराज्य गाजवणाऱ्या या महान खेळाडूची २० व्या शतकांतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. ब्रिटनच्या राणीने त्यांना सर हा किताब देऊन त्यांचा गौरव केला असून युनिस्कोने त्यांची शांतता दूत म्हणून नेमणूक केली. ब्राझीलच्या अध्यक्षांनी त्यांचे वर्णन ब्राझीलचा खजिना असे केले होते. फुटबॉलप्रेमी मात्र त्यांना द किंग याच नावाने संबोधित असत. 

 हो ते राजेच होते. केवळ राजे नव्हे तर सम्राट होते. फुटबॉलचे अनभिषिक्त सम्राट. त्यांच्या निधनाने केवळ फुटबॉलवरच नव्हे तर संपूर्ण क्रीडा विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. फुटबॉलचे अनभिषिक्त सम्राट पेले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!