नवी दिल्ली : अंडर १९ वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताला दणदणीत विजय मिळवून देणारा शुभमन गिल सध्या युवा भारतीय संघातील ‘विराट कोहली’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. विराटला रोल मॉडल मानणाऱ्या शुभमनची खेळण्याची स्टाइल हुबेहूब विराट सारखीच आहे. तोही विराटप्रमाणेच स्ट्रोक्स मारतो. विशेष म्हणजे मैदानावर उतरण्यापूर्वी तो विराटप्रमाणेच कमरेत लाल रुमाल खोवतो. लाल रुमाल कमरेला खोवून खेळल्यामुळे मैदानावरची कामगिरी चांगली होते, असं त्याचं म्हणणं आहे.   शुभमनने आपण विराट कोहलीचे फॅन असल्याचं स्पष्ट केलं. पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ‘ऑल टाइम फेव्हरिट’ असल्याचंही त्यानं नमूद केलं. ‘सचिन महान खेळाडू आहे. पण सध्या क्रिकेटचं मैदान गाजविणाऱ्या विराटची स्टाइल मला आवडते. विराट दबावातही उत्तम खेळतो. दबावाला हाताळण्याची त्याची शैली वाखाणण्यासारखी आहे. मलाही तसंच व्हायचं आहे,’ असं तो म्हणाला. युट्यूबवर विराटच्या बॅटिंगचे व्हिडिओ पाहूनच नेट प्रॅक्टिस करत असल्याचंही त्यानं सांगितलं.
लाल रुमालाचे रहस्य

‘कमरेत लाल रुमाल खोवून खेळायची मला सवय आहे. त्याआधी सफेद रुमाल कमरेला खोवायचो. परंतू एकदा लाल रुमाल कमरेला खोवून खेळलो आणि शतक झळकावले. तेव्हापासून मग लाल रुमालच कमरेला खोवून खेळायला सुरुवात केली,’ असं सांगत शुभमनने आपल्या यशाचं गुपितही उघड केलं. तर ‘शुभमन नेहमीच सर्वस्व झोकून खेळला आहे. त्याने पाकिस्तान विरोधात शतक झळकावल्यानं आम्हाला अत्यानंद झाला आहे,’ असं शुभमनचे वडील लखविंदर सिंह यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here