जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेनेच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘शिवसेनेत सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत नाही आणि ते माझ्यावर टीका करत आहेत. आधी सत्तेतून बाहेर पडा, हिंमत दाखवा आणि मगच माझ्यावर टीका करा,’ अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी शिवसेनेला सुनावले आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून एकनाथ खडसे यांच्यावर शेलक्या शब्दातून टीका करण्यात आली आहे. ‘सत्तेचा गैरवापर करून खडसे यांनी शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कर्माची फळे त्यांना मिळत आहेत. खडसे पक्षात राहिले काय किंवा गेले काय, भाजपला आता काहीच फरक पडत नसून खडसे सध्या उपेक्षा आणि मानहानीचं जीवन जगत आहेत. सत्ताबदलानंतर ते मुख्यमंत्री व्हायला म्हणजे ‘हीरो’ बनायला निघाले होते, पण राजकीय रंगमंचावर त्यांना जो ‘साईड रोल’ मिळाला तो देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढून घेतला,’ अशी खरमरीत टीका शिवसेनेने केली होती. शिवसेनेची ही टीका झोंबल्याने खडसे यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

‘शिवसेनेच्या टीकेची मला दखल घ्यावीशी वाटत नाही. शिवसेना सत्तेत बसून भाजपा व सरकारवर टीका करते. म्हणूनच शिवसेनेनं आधी सत्तेतून बाहेर पडावं, मगच टीका करावी,’ अशी टीका खडसे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here