जन्मकुंडली ही समाजाला लागलेली कीड 

जन्मकुंडली ही समाजाला लागलेली कीड 

जन्मकुंडली ही समाजाला लागलेली कीड 
✍ भवन लिल्हारे ✍
!! भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी !!
!! मीडिया वार्ता न्युज !!
8308726855,8799840838

जन्मकुंडली ही एक समाजाला लागलेली एक कीड असे मला मनापासुन वाटते. मुल जन्माला आले की ‘जन्मकुंडली काढुन घ्या’ असे सांगणारे कुणीतरी उपटतेच. एकवेळ जन्माचा दाखला उशिरा काढला तरी चालेल पण जन्मकुंडलीआधी काढा असे सांगणारे महाभागही असतात. एखाद्या गर्भार स्त्रीला डॉक्टरांनी ९ महिने + ९ दिवस धरुन जो प्रसुती दिवस सांगितलेला असतो नेमका तोच दिवस कसा खराब आहे हे सांगणारा महामुर्ख त्या कुटूंबाला भेटतो आणि होणार्‍या बाळाच्या भवितव्याबद्दल नको त्या चिंता निर्माण करुन ठेवतो. इकडे बाळाची होणारी आई, वडील, अजोबा, आज्जी सगळे डॉक्टरला विनंती कम जबरदस्ती करुन त्या अपेक्षीत दिवसाच्या आधीच एखादा चांगला दिवस बघुन डिलिव्हरी करा म्हणुन भुणभुण लावतात. डॉक्टरने असमर्थता दाखवली तर सरळ डॉक्टरच बदलतात. अशा महामुर्ख कुटूंबाला त्या होणार्‍या बाळाच्या आणि आईच्या आरोग्याची जराही फिकीर नसते. मी तर एक महाभाग कुटूंब असे पाहिले आहे की त्यांना पितृपंधरवड्यात जन्मणारे बाळ नको होते. डॉक्टरांनी नेमकी पंधरवड्याच्या शेवटाची तारीख दिलेली. काहिही करुन ते बाळ पितृपंधरवड्याच्या आधी अथवा नंतरच जन्मावे म्हणुन त्या कुटुंबाने अक्षरशः १२ दिवस आधीच जन्माला घालायला भाग पाडले. त्यानंतर ते बाळ अशक्त आहे म्हणुन ८ दिवस काचेच्या पेटित ठेवले होते. बाळाच्या आजी-आजोबांच उत्साह दांडगा. येणार्‍या-जाणार्‍या प्रत्येक परिचिताला आपल्या पराक्रमाची रसभरीत वर्णने करताना थोडीसुद्धा शरम वाटत नव्हती.

पत्रिका

जन्मकुंडली चांगली यावी म्हणुन मुलांचा जन्म हव्या त्या दिवशी करुन घेणार्‍या कुटुंबांचा हुशारपणा बघत असतानाच मागे एकदा पत्रिका देखिल बदलुन लग्न लावणारे कुटूंब पाहण्यात आले. त्यांच्या मुलीच्या लग्नकुंडलीत मंगळ होता. त्यामुळे तिचे लग्न ठरत नव्हते. दिसायला देखणी आणि चांगल्या पगाराची नोकरी असुनही लग्न ठरण्यात अडाचणी येऊ लागल्या तेव्हा त्या काकांनी तिच्या जन्माचा दिवसच बदलुन घेतला. १ दिवस आधी जन्मवेळ दाखवल्यामुळे तिच्या पत्रिकेतुन मंगळ आपोआप अंतर्धान पावला आणि लगेच लग्न ठरले. तिच्या लग्नाला आता १० वर्षं झाली. २ मुले आहेत. सगळे सुरळीत चालु आहे.

मला अजुनही आठवते की मी एकदा आजीला विचारले होते की तिचे लग्न कुंडली पाहुन झाले का? तर ती “नाही” म्हणाली होती. माझ्या आई-वडिलांचे लग्न देखिल कुंडली न बघताच झालेले. म्हणजे कुंडली पहाण्याचे फॅड गेल्या २०-३० वर्षांपासुन सुरु झाले असावे असा माझा कयास.

कुंडली आणि पत्रिका हे थोतांड आहे यावर मी ठाम आहे पण एखाद्या अंधपणे विश्वास ठेवणार्‍याला खालील प्रश्न विचारले तर मात्र त्यावर समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत :

– चांगली वेळ पाहुन मुल जन्माला घालायला लावणारे निसर्गाच्या विरोधात जाऊन बाळाचे भविष्य सुरक्षीत करु शकत असावेत का?
– सिझरेयन बाळाची जन्मवेळ खरी मानावी का?
– कुंडली आणि पत्रिका यांवर विसंबुन लग्ने ठरवणार्‍यांच्या आजि-आजोबांनी पत्रिका पाहुन लग्न केलं होतं का?
– कुंडली/पत्रिका या फक्त ठराविक धर्मातील मुला/मुलींनाच कशा काय लागु होतात?
– मंगळ ग्रह एखाद्या मुस्लिम, जैन, परशी, शीख, बौद्ध,ख्रिस्ती समाजातील मुलांना/मुलींना त्रासदायक कसा काय नसतो?

हे सर्व थोतांड आहे हे थोड्या विचाराअंती कोणालाही कळु शकेल परंतु ज्यांची उपजिविका या गोरख धंद्यावर चालते त्यांनी अशा कुंडाल्या-पत्रिका बघुन समाजाला फसवण्याचा उद्योग अविरत चालु ठेवला आहे आणि तो फोफावतो आहे हे बघुन समाज कोणत्या दिशेस जातोय हा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. सरकार अशा फसवेगिरी करणार्‍यांवर वचक ठेवण्यास कमी पडत आहे तरिही आपण आपल्या घरच्यांना, नातेवाईकांना, परिचितांना समजावुन सांगुन या थोतांडापासुन नक्कीच दूर ठेऊ शकु असे वाटते.