☀️ सूर्य आग ओकू लागला, उकाड्याने जनजीवन विस्कळीत
• ब्रम्हपुरी 46.9, तर चंद्रपुरचा पारा 45.6 अंशावर🔥
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 30 मे
हवामान विभागाने यापूर्वीच उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. गुरूवार, 30 मे रोजी विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद जिल्ह्यातील ब्रम्हपुरी व चंद्रपूर महानगरात झाली. नवतपात सूर्य आग ओकू लागला असून, विदर्भात ब्रम्हपुरी शहरात 46.9 अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर महानगरात 45.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदल्या गेले. गेल्या चार दिवसांपासून जिल्हा होरपळून निघतो आहे.
उष्ण शहर म्हणून जिल्ह्याचा उन्हाळा राज्यात प्रसिद्ध आहे. सर्वाधिक तापमानाची नोंद अनेकदा जिल्ह्यात होते. यंदाही चंद्रपूर जिल्ह्याची ही ओळख कायमच आहे, असेच चित्र दिसत आहे. नवततपात सूर्याने प्रकोप दाखविणे सुरू केले आहे. वाढत्या उष्णतामानामुळे जनजीवनावरच परिणाम झाला आहे. सकाळी 8 वाजतापासून उन्हाचे चटके बसत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. एरवी गजबजलेले चंद्रपुरातील मुख्य रस्ते दुपारी ओस पडू लागले आहेत. दुपारी शहरात निरव शांतता बघायला मिळते. दुपारच्या सुमारास महानगरात शुकशुकाट पसरल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात 45.00 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल गोंदिया 44.8, नागपूर 44.6, अमरावती 44.2, अकोला 42.9, वाशिम 42.8, तर बुलढाणा जिल्ह्यात 39.00 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.