रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रामध्ये मनाई आदेश जारी
✍️नितेश पुरारकार ✍️
नांदवी पुरार प्रतिनिधी
📞70211 58460📞
माणगांव :-रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रामध्ये खालापूर, खोपोली, रसायनी, रोहा, माणगांव, महाड, नागोठणे, अलिबाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कारखाने असून औद्योगिक कंपन्यांमध्ये कामगार संघटनांकडून आपल्या विविध मागण्यांसाठी अचानक संप व आंदोलन पुकारण्यात येत असतात. त्यामुळे अनेक वेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत लोकसभा निवडणूक-2024 च्या मतदानाची मतमोजणी दि.04 जून 2024 रोजी होणार आहे. महाड तालुका पोलीस ठाणे हद्दीत दि.05 जून 2024 व दि.06 जून 2024 रोजी किल्ले रायगड येथे शिवराज्यभिषेक सोहळा पार पडणार आहे. पेण पोलीस ठाणे हद्दीत शेडीशी ग्रामपंचायत येथी क्लिच ड्रग्ज (इंडिया) लि. या कंपनीच्या आरेरावीबाबत निवेदन देवूनसुध्दा अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई न झाल्याने सरपंच ग्रामपंचायत शेडाशी व ग्रामस्थ शेडाशी हे दि.07 जून 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषणास बसणार आहेत. वडखळ पोलीस ठाणे हद्दीत ज्येष्ठ पत्रकार रमेश नामदेव देवरुखकर, मुक्त पत्रकार न्युज महाराष्ट्र हे जे.एस.डब्ल्यू. कंपनी हेतुपरस्परपणे हलगर्जी करत असल्याचे विरोधात दि.10 जून 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषणास बसणार आहेत. दि.09 जून 2024 रोजी महाराणा प्रताप जयंती साजरी करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यात लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने दि.16 मार्च 2024 रोजी पासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या सर्व परिस्थिती लक्षात घेता, औद्योगिक क्षेत्रात शांतता प्रस्थापित राहावी. तसेच सण उत्सव व राजकीय परिस्थिती आंदोलन/उपोषण व आत्मदहनाच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत दि.31 मे 2024 ते दि.14 जून 2024 रोजीचे 24.00 वाजेपर्यत या कालावधीकरीता मुंबई पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) मधील (अ), (ब), (क), (ङ), (ई) व (फ) प्रमाणे खालील कृत्ये करण्यास या अधिसूचनेद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे.
शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, बंदूका, सुरे काठ्या किंवा लाठ्या अगर शारिरीक दुखापत करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही तत्सम वस्तू बाळगणे. अंग भाजून टाकणारा पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे. दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. व्यक्ती, प्रेत, आकृत्या यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे. सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा देणे किंवा गाणे म्हणणे किंवा वाजविणे. सभ्यता अगर निती याविरुध्द असतील अशी जिल्हयाची शांतता धोक्यात आणतील किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथून पाडण्याचा संभव आहे अशी आवेशपूर्ण भाषणे किंवा हावभाव करणे किंवा सोंग करणे, चित्र, चिन्हे अगर कोणतीही तत्सम वस्तू, जिन्नस तयार करणे किंवा लोकांत प्रसार करणे. रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत पूर्व परवानगीशिवाय पाच अगर पाचाहून अधिक व्यक्तीचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास किंवा मिरवणूकीस मनाई राहील.
तसेच सदर अधिसूचना वरिष्ठांच्या आदेशानुसार किंवा कर्तव्यपुर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे, शासकीय अधिकाऱ्यांना अशी हत्यारे योग्य रितीने बाळगण्यासाठी अगर ठेवून घेण्यासाठी लागू नाही. सदर अधिसूचना ही खऱ्या प्रेत यात्रेसाठी, अंत्यविधीच्या जमावास अगर शासकीय समारंभासाठी लागू नाही. तथापि, सदर कालावधीत होणारे उत्सव, सभा, मिरवणूका इत्यादी कार्यक्रमास परवानगी देण्याचे अधिकार संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना देण्यात येत आहेत. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन शांतता धोक्यात येणार नाही याची जबाबदारी आयोजकांवर राहील, या अटीवर परवानगी द्यावी.