उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांचा माती परीक्षणावर भर
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- खरीप हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. यासाठी रायगडमधील शेतकरी नव्या बियाणांसह माती परीक्षण करून कोणते पीक किंवा फळझाडे लागवड करावीत,याचा निर्णय घेत आहेत. आतापर्यंत २८ हजार ७३८ माती नमुनांची चाचणी प्रयोगशाळेत करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील 24259 माती व पाणी नमुनांची तपासणी करण्याचे लक्षाक कृषी विभागाला देण्यात आले आहे. यापैकी कृषी विभागाला 23 हजार 738 नमुने प्राप्त झाले. जिल्हा कृषी विभागाच्या मृद सर्वेशन चाचणी प्रयोगशाळेने १४ हजार ६१५ माती नमुने तपासले असून उर्वरित नमुने तपासण्यासाठी अशासकीय मृद चाचणी प्रयोगशाळेची मदत घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यात एक लाख 79 हजार शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका देण्याचे उद्दिष्ट आहे. रायगड जिल्हा हा भाताचे कोठार म्हणून भौगोलिक नकाशावर आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिके घेतली जातात. आंबा उत्पादन घेतले जाते. असे असतानाही रायगडातील शेतकरी स्वतःच्या आरोग्याबरोबरच आता धनधान्य देणारा काळ्या आईच्या आरोग्याची तपासणी करताना दिसून येत आहे. माती परीक्षणानुसार पिकाची किंवा झाडांची लागवड केल्यास वाढ त्यांची फळधारणा चांगल्या प्रकारे होऊ शकते. काही ठराविक प्रकारच्या मातीमध्ये ठराविक पिके घेणे योग्य असते. यासाठी शेतकऱ्यांनी मातीचे परीक्षण करावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी वंदना शिंदे यांनी केली आहे.
रसायनिक खतांच्या अतिवापरामुळे उपयुक्त व हानिकारक घटक समजण्यासाठी माती व जमिनीला देण्यात येणाऱ्या पाण्याची तपासणी करणे गरजेचे आहे. मातीची तपासणी केल्यास खतांचा वापर उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ झाल्यास शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारण्यास मदत होणार आहे.
*अवाजवी खतामुळे बिघडते आरोग्य*
अभी उत्पादन मिळण्यासाठी रसायनिक खतांचा अवाजवी व असंतुलित वापर, जमीन सतत पिकाखाली राहणे, पाण्याचा योग्य वापर आदींमुळे जमिनीचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत आहे. यामुळे पिकाची खुरटलेली वाढ, उत्पादन क्षमतेमध्ये घट आदी बाबी दिसून येत आहेत. शेती नियोजनात जमिनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मृदा व पाणी परीक्षणावर आधारित सूयोग्य व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे.
*माती परीक्षण केल्याचे फायदे*
माती परीक्षणामुळे शेत जमिनीचा प्रकार, तिचे भौतिक ,रसायनिक, काही गुणधर्म ,अन्न द्रव्याची उपलब्धता यानुसार जमिनीमध्ये हवा, पाणी त्यातील समतोल राखणे, घनता आदी दोष दूर करणे, जमिनीत उपलब्ध अन्नद्रव्य तसेच पिकास आवश्यक अन्नद्रव्य मात्र या आधारे आवश्यक खत मात्रांचा अवलंब करणे शक्य आहे.
*जमिनीची आरोग्यपत्रिका*
जमिनीच्या आरोग्याविषयी शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करणे व तिचे आरोग्य शाश्वत स्वरूपात जतन करण्याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आरोग्य पत्रिका देण्यात येत आहेत. शेतकऱ्यांमध्ये शेतीबाबतची जनजागृती करून शेतकऱ्यांना उत्पादन क्षमता वाढवण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. मार्चअखेर सर्व माती नमुने आणि जमीन आरोग्यपत्रिका वाटप करण्याचे नियोजन केले आहे.