२६ जुलै २०२५ : कारगिल विजय दिवस आणि सैनिक फेडरेशनचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

२६ जुलै २०२५ : कारगिल विजय दिवस आणि सैनिक फेडरेशनचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

मुंबई येथे सर्व सुविधा युक्त भव्यसैनिक भवन उभारण्याचा संकल्प: आमदार प्रवीण दरेकर

सिद्धेश पवार
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
8482851532

मुंबई २६ जुलै २०२५ रोजी ‘कारगिल विजय दिवस’ आणि ‘सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य’ च्या वर्धापन दिनानिमित्त शहीद स्मारक, फोर्ट, मुंबई येथे भव्य राष्ट्रभक्तिपूर्ण सोहळा पार पडला. या कार्यक्रमास शेकडो माजी सैनिक, सैनिकांचे कुटुंबीय आणि देशभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१९९९ साली झालेल्या कारगिल युद्धाला यावर्षी २६ वर्षे पूर्ण झाली. या युद्धात ५२७ भारतीय सैनिकांनी आपले प्राण देशासाठी अर्पण केले. पाकिस्तानी सैनिकांनी उग्रवाद्यांच्या मदतीने केलेल्या घुसखोरीला भारतीय सेनेने धाडसाने प्रत्युत्तर दिले आणि भारताची सीमारेषा अबाधित राखली. या युद्धातील शौर्य व बलिदानाचे स्मरण करत सर्व शहीदांना आदरांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रवीण दरेकर, कर्नल डी. राजा, आमदार मनीषा कायंदे, सामाजिक कार्यकर्त्या शायना एन.सी., राष्ट्रपती पुरस्कार विजेते अभिनेते अरुण नलवडे, अ‍ॅडिशनल कमिशनर समीर वानखेडे, अभिनेत्री क्रांती रेडेकर, जय भीम आर्मी अध्यक्ष नितीन मोरे, शिवराज्य ब्रिगेड अध्यक्ष अमोल जाधवराव, मुंबई विद्यापीठाचे माजी प्राचार्य दिलीप पाटील, बेडेकर लोणच्याच्या अध्यक्षा अनघा बेडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपल्या भाषणात आमदार प्रवीण दरेकर यांनी मुंबईत सर्व सुविधा युक्त भव्य सैनिक भवन उभारण्याचा संकल्प जाहीर केला. सैनिकांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधत त्यांनी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक लावण्याचे आश्वासन दिले.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांनी देशातील ड्रग्स विरोधी मोहिमेची माहिती देत देशरक्षणात सैनिकांची भूमिका अधोरेखित केली. ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सैनिक फेडरेशनने सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी केलेल्या कार्याचा आढावा घेत सर्वांना एकत्र येण्याचे व देशहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.

सैनिक फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी सुभेदार निंबाळकर यांनी कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष सुभेदार सुभाष दरेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या वेळी सैनिक फेडरेशन मुंबई अध्यक्ष श्री. फ्लेचर पटेल, कॅप्टन सुभाष चव्हाण (राज्य सचिव), रवींद्र घनबहादुर (उद्योग विभाग), सरदार चोपडे, शत्रुघ्न महामुडकर, शंकर वडकर (वाशिम), युसुफ ख्वाजा (अकोला), राजू पाटील (ठाणे), निलेश पाटील (पालघर), शोभा गरंडे व सुप्रिया उतेकर (महिला ब्रिगेड) तसेच रायगडचे विजय जगताप आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात युनायटेड एक्स-सर्व्हिस मॅन बदलापूर, इंडियन एक्स-सर्व्हिस मॅन लीग, पंचरत्न मित्र मंडळ, युथ कौन्सिल या संस्थांचा सक्रिय सहभाग होता.

ठाणे, पालघर, रायगड, अकोला, वाशिम, अमरावती, सातारा, कोल्हापूर, नवी मुंबई आणि मुंबई येथील शेकडो सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या उत्साहात सहभागी होऊन देशभक्तीचे दर्शन घडवले.

भारत माता की जय! जय जवान!