फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनतर्फे
अलिबागमध्ये देहदानाबाबत जनजागृतीसाठी दोन कार्यशाळांचे आयोजन
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन या संस्थेच्या पुढाकाराने आणि विविध संस्थांच्या सहभागाने ३ व ४ ऑगस्ट रोजी अलिबाग येथे स्थानिक पातळीवर सामाजिक कार्य करणारे व इतर उपक्रमांतील कार्यकर्ते, आरोग्यसेवेतील व्यक्ती, वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्यासाठी दोन स्वतंत्र कार्यशाळा आयोजित करून राष्ट्रीय अवयवदान दिन दिवस साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे मुख्य समन्वयक कुमार कदम यांनी गुरुवारी (दि. ३१) पत्रकार परिषदेत दिली. कमळ सेवा संस्थेचे संचालक गिरीश तुळपुळे यावेळी उपस्थित होते.
भारत सरकारने ३ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अवयवदान दिन म्हणून जाहीर केला आहे. भारतात ३ ऑगस्ट १९६५ रोजी पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती. त्यामुळे तो दिवस भारत सरकारने देशभर राष्ट्रीय अवयवदान दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या विविध भाषणांमध्ये तसेच ‘मन की बात’मध्ये देहदान, नेत्रदान, त्वचादान, अवयवदान या कार्याला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे. त्यांना अनुसरून, महाराष्ट्र राज्यातही येत्या ३ ते १५ ऑगस्ट २०२५ दरम्यान अवयवदान पंधरवडा पाळला जाणार आहे. या देशव्यापी कार्यक्रमाचा एक भाग म्हणून अलिबाग येथे दोन दिवस कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. दोन्ही कार्यशाळांना दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन या संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष पुरुषोत्तम पवार आणि फेडरेशनच्या कार्यकारी समिती सदस्या डॉ. श्रीमती शुभदा कुडतरकर मार्गदर्शन करणार आहेत, असे कुमार कदम यांनी सांगितले.
यातील पहिली कार्यशाळा रविवारी (दि. ३) सकाळी ११ ते १ या दरम्यान कमळ डायलिसिस सेंटर, म्हाडा कॉलनी, श्रीबाग नं. २, अलिबाग येथे संपन्न होईल. या कार्यशाळेचे उद्घाटन आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दुसरी कार्यशाळा सोमवारी (दि. ४ ) सकाळी ११ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने, सिव्हील हॉस्पिटल कंपाऊंड, अलिबाग येथे विद्यार्थी, आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या व्यक्ती व अधिकारी तसेच कर्मचारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील यांनी या कार्यशाळेचे नियोजन केले आहे. कार्यशाळांना राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. थळ यांचे सहकार्य लाभले आहे.