*नागपुरात दारुड्या इंजिनिअर पित्याने पोटच्या मुलीचा गळा आवळला, चिमुरडीचे प्राण कसे वाचले*.

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953
*आरोपी नेहमीप्रमाणे मद्यधुंद अवस्थेत घरी आला. आधी फोन करुन त्याने आपल्या सासऱ्याला शिवीगाळ केली. त्यानंतर वडिलांशीही वाद घातला. आवाज ऐकून त्याची मोठी मुलगी बाहेर आली. तेव्हा त्याने गळा दाबून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे*
नागपूर : दारुड्या बापाने पोटच्या मुलीचा गळा आवळून जीव घेण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलीचे आजोबा वेळीच आल्याने तिचा जीव बचावला. व्यसनाधीनतेला कंटाळून पत्नी माहेरी निघून गेल्यानंतर पतीने क्रूरतेचा कळस गाठला. नागपूरमधील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ही थरारक घटना घडली. पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे, तर मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
43 वर्षीय पिता सिव्हील इंजिनिअर म्हणून नोकरी करत होता. मात्र दारुच्या व्यसनामुळे तीन वर्षांपूर्वी त्याच्यावर नोकरी गमवण्याची वेळ आली. पतीच्या व्यसनाधीनतेला कंटाळून पत्नी सात वर्षांच्या मुलीला घेऊन माहेरी निघून गेली, तर बारा वर्षांची मोठी मुलगी आणि वडिलांसोबत आरोपी बाप नागपुरातील हुडकेश्वर भागात राहतो. वडिलांचे पेन्शन हा या कुटुंबाच्या उत्पन्नाचा एकमेव स्त्रोत असल्याचं बोललं जातं. त्यातच बराचसा पैसा तो दारुवर खर्च करत असल्यामुळे वडीलही त्रासले होते.
मोठ्या मुलीची हत्या करण्याचा प्रयत्न
रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास आरोपी नेहमीप्रमाणे मद्यधुंद अवस्थेत घरी आला. आधी फोन करुन त्याने आपल्या सासऱ्याला शिवीगाळ केली. त्यानंतर वडिलांशीही वाद घातला. आवाज ऐकून त्याची मोठी मुलगी बाहेर आली. तेव्हा त्याने गळा दाबून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे.
आजोबांच्या प्रयत्नांमुळे मुलगी बचावली
मुलगा नातीच्या जीवावर उठल्याचं पाहून आजोबांनी पूर्ण प्रयत्न करुन त्याला दूर ढकललं आणि जोराने आरडाओरड केली. आजोबांचा आवाज ऐकून शेजारी मदतीसाठी धावले. दारुड्या बापाच्या तावडीतून त्यांनी लहानगीची सुटका केली. मात्र यामध्ये ती बेशुद्ध पडल्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दारुड्या बापाचा पोलीस स्टेशनमध्येही धिंगाणा
आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या मात्र पोलीस स्टेशनमध्येही त्याने गोंधळ घातल्याची माहिती आहे. दरम्यान त्याला कोर्टात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
मुंबईकर तरुणाची बायकोला नांदायला बोलवण्यासाठी अघोरी युक्ती
दुसरीकडे, पत्नी माहेरी निघून गेली आणि वारंवार विनवण्या करुनही घरी परत येत नाही, म्हणून पतीने क्रौर्याची परिसीमा गाठल्याचा प्रकार नुकताच मुंबईत समोर आला होता. आरोपी बापाने स्वत:च्या मुलीला फासावर लटकवण्याचा प्रयत्न करत त्याचे फोटो बायकोला पाठवले होते. मुलगा मेला आणि मुलगी गळफास घेतेय लवकर मुंबईत परत ये, अशी धमकी त्याने पत्नीला दिली होती. मुंबईतील मालाडच्या कुरार परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याच्या तावडीतून दोन्ही मुलांची सुटकाही केली.