शरद पवारांची मोठी खेळी, एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेंचं प्रमोशन, पक्षाकडून मोठी जबबादारी

75

शरद पवारांची मोठी खेळी, एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेंचं प्रमोशन, पक्षाकडून मोठी जबाबदारी

✍🏻 जितेंद्र कोळी ✍🏻
पारोळा तालुका प्रतिनिधी
संपर्क न.-9284342632

रोहिणी खडसेंवर मोठी जबाबदारी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून नियुक्तीची घोषणा.

जळगाव -राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्षातील फुटीनंतर संघटनात्मक फेरबदल सुरु केले आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण यांच्या जागेवर रोहिणी खडसे यांना संधी दिली आहे. तर, दुसरीकडे नुकतेच पक्षात आलेले परळीतील नेते बबनराव गिते यांना प्रदेश उपाध्यक्षपदी बढती देण्यात आली आहे. रोहिणी खडसे यांना जबाबदारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्त्वानं मोठी खेळी केल्याचं बोललं जात आहे.

रोहिणी खडसे – खेवलकर या माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या असून त्या उच्च शिक्षित आहेत. त्यांचे शिक्षण वकिली क्षेत्रात एल एल बी, एल एल एम पर्यंत झालेले आहे.२०१९ मध्ये भाजपने एकनाथ खडसे यांना उमेदवारी नाकारली होती, त्यावेळी खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवली होती, या निवडणुकीत त्यांचा अल्पशा मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या सोबत रोहिणी खडसे यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत हाताला घड्याळ बांधली होती.

रोहिणी खडसे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक शिक्षण व विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा व विद्यमान संचालिका आहेत. रोहिणी खडसे यांच्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात जळगाव जिल्हा मध्य बँक ऑडिट मध्ये ” क” दर्जा वरून” अ” दर्जामध्ये आली होती त्यांच्या कार्यकाळात बँकेचे संगणकीकरण, एटीएम सेवा सुरू झाली होती. त्यांच्या कार्यकाळात बँकेने आघाडी घेऊन विविध क्षेत्रात पुरस्कार मिळवले होते.

मुक्ताईनगर येथील आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणीच्या अध्यक्षा असून त्यांनी एकनाथ खडसे यांनी स्थापन केलेली परंतु काही कारणाने अपूर्णावस्थेत असलेली सूतगिरणी सुरू करून स्थानिक महिला आणि युवकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या रोहिणी खडसे उपाध्यक्ष आहेत.याचबरोबर त्या मुक्ताईनगर परिसरातील प्रमुख शैक्षणिक संस्था असलेल्या मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी मुक्ताईनगरच्या अध्यक्षा आहेत. यासंस्थे अंतर्गत बालवाडी ते पदव्युत्तर शिक्षणाची सोय आहे जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनेच्या रोहिणी खडसे कार्याध्यक्ष आहेत. अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबईच्या नियामक मंडळाच्या माजी सदस्या असून अखिल भारतीय नाट्य परिषद, शाखा जळगावच्या रोहिणी खडसे अध्यक्षा म्हणुन काम पाहत आहेत. मुक्ताईनगर परीसरात सामजिक, धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग असतो.

भारतीय जनता पक्षात असताना त्यांनी जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्या नंतर मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्या साठी रोहिणी खडसे मेहनत घेत आहेत. मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात त्यांनी राष्ट्रवादी जनसंवाद यात्रा काढली होती. राज्यात जनसंवाद यात्राही पहिल्यांदाच रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघात काढली होती या यात्रेचं जळगाव जिल्ह्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, याबरोबरच वरिष्ठ नेत्यांनी मोठं कौतुक केलं होतं. तसेच इतर जिल्ह्यात अशाच पद्धतीने जनसंवाद यात्रा काढण्याच्या पदाधिकाऱ्यांना आदेश केले होते