अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई च्या अध्यक्ष पदी पत्रकार मिलिंद अष्टीवकर यांची निवड
संपूर्ण महाराष्ट्रासह रायगड जिल्ह्यात जल्लोष
१ सप्टेंबर पासून अध्यक्ष पदाची सूत्रे अष्टिवकर यांच्या हाती
१ सप्टेंबर रोजी रोहा येथे भव्य सत्कार समारंभाचे आयोजन
बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्यातील रोहा येथील डॅशिंग, झुंजार,निर्भीड आणि अभ्यासू पत्रकार मिलिंद अष्टीवकर यांची अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. १ सप्टेंबर रोजी ते अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई च्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. सदर आनंदाची बातमी सोशल मीडियावर झळकताच संपूर्ण महाराष्ट्रासह रायगड जिल्ह्यातून आणि रायगड प्रेस क्लबच्या वॉट्सअप ग्रुप वरुन पत्रकार मिलिंद अष्टीवकर यांच्यावर सोशल मीडिया, वॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम वरून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. पत्रकार मिलिंद अष्टीवकर हे महाराष्ट्र राज्यासह रायगड जिल्ह्यातील एक अजातशत्रू चतुरस्त्र, डॅशिंग झुंजार व निर्भीड व्यक्तीमत्व असून अत्यंत हुशार, अभ्यासू , संयमी, प्रेमळ आणि मुत्सद्दी असा त्यांचा लौकिक आहे. पुढील दोन वर्षे मिलिंद अष्टीवकर हे परिषदेचं नेतृत्व करणार आहेत. त्याच्याकडे परिषदेचे नेतृत्व दुसऱ्यांदा येत आहे. यापुर्वी सुप्रिया पाटील परिषदेच्या अध्यक्ष होत्या.
मिलिंद अष्टीवकर हे २०२२ ते २०२४ या कालावधीत कार्याध्यक्ष होते. ते १ सप्टेंबर रोजी नवीन अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतील. मिलिंद अष्टीवकर हे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई चे ४५ वे अध्यक्ष असतील. मिलिंद अष्टीवकर गेली २० वर्षे पत्रकारितेत सक्रीय आहेत रायगड प्रेस क्लबचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव, परिषदेचे कोषाध्यक्ष आणि नंतर कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली आहे. कोकण विभागीय
अधिस्वीकृती समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविलेले आहे.
दैनिक लोकमत, रत्नागिरी, रायगड टाइम्स,रायगड नगरी कृषीवल इत्यादी दैनिकांसाठी ते काम करत आहेत.
पत्रकार मिलिंद अष्टीवकर यांचा समाजकारण, राजकारण, पत्रकारिता आदी क्षेत्रांचा गाढा अभ्यास आहे. मैत्री भाव, सामाजिक बांधिलकी जपणारा, आणि चळवळीशी एकनिष्ठ नातं जपणारा कार्यकर्ता पत्रकार अशी त्यांची ओळख आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक,धार्मिक चळवळींशी त्यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या लढ्याचं त्यांनी कुशल आणि उल्लेखनीय असे नेतृत्व केलं. पत्रकारांच्या हक्कासाठीच्या लढ्यात त्यांचा सक्रीय सहभाग होता. पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार योजना आणि पत्रकारांवरील हल्लयाच्या विरोधात परिषदेने उभारलेल्या लढ्यात त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. परिषदेचे नेते माननीय एस.एम. देशमुख यांनी मिलिंद अष्टीवकर यांचे अभिनंदन केले असून त्याच्या भावी कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या आहेत.
परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, मावळते अध्यक्ष शरद पाबळे यांनीही मिलिंद अष्टीवकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पत्रकार परिषदेने शरद पाबळे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यकारिणीने उल्लेखनीय कार्य केले आहे. या काळात परिषदेची सदस्य संख्येत लक्षणीय वाढ झाली असून तालुका आणि गाव पातळीपर्यंत शाखा विस्तार झाला आहे. या काळात पत्रकारांच्या हक्काचे विविध लढे लढले गेले, राज्यातील शेकडो पत्रकारांना मदत करण्याची भूमिका परिषदेने घेतली.परिषदेची चळवळ अधिक गतीमान केल्याबद्दल यांनी शरद पाबळे, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी यांनी धन्यवाद दिले आहेत. १ सप्टेंबर रोजी रोहा नगरीत त्यांच्या भव्य दिव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात रायगड प्रेस क्लबच्या वतीने तसेच रायगड जिल्ह्यातील सर्व तालुका निहाय प्रेस क्लब च्या वतीने आणि माणगाव तालुका प्रेस क्लबच्या सर्व विद्यमान आणि आजी माजी पदाधिकारी यांच्या वतीने त्यांचे यथोचित स्वागत आणि सत्कार करण्यात येणार आहे.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई चे नव निर्वाचित, नवनियुक्त अध्यक्ष सन्माननीय पत्रकार मिलिंद जी अष्टीवकर साहेब यांचे पत्रकार विश्वास गायकवाड उपाध्यक्ष माणगाव तालुका प्रेस क्लब आणि माणगाव तालुका प्रेस क्लब च्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील अध्यक्षीय कारकिर्दीस मंगलमय शुभेच्छा…!