मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला हायवे म्हणावे की डाय वे ( मृत्यू चा मार्ग )

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला हायवे म्हणावे की डाय वे ( मृत्यू चा मार्ग )

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला हायवे म्हणावे की डाय वे ( मृत्यू चा मार्ग )

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर यज्ञेश उभारे चा भिषण अपघातात दुर्दैवी मृत्यू

माणगावात दुःखाची शोककळा

बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दररोज अपघाताची मालिका सुरूच आहे. शुक्रवार दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी रात्री १० वाजता माणगाव रेल्वे स्थानका समोर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मिनी टेम्पो आणि बुलेट यांच्यात झालेल्या भिषण अपघातात माणगाव पंचायत समिती चे माजी सभापती मा. प्रभाकर दादा उभारे यांचे चिरंजीव कुमार यज्ञेश प्रभाकर उभारे या अवघ्या बावीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
कु. यज्ञेश प्रभाकर उभारे हा शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास इंदापूर कडून माणगाव च्या दिशेने येत असताना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव रेल्वे स्थानकासमोर आला असता माणगाव शहरा कडून मुंबई च्या दिशेने येणाऱ्या मिनी टेम्पो चा आणि कु. यज्ञेश उभारे चालवत असलेल्या बुलेट चा भिषण अपघात झाला. सदर अपघात इतका भिषण होता की, कु. यज्ञेश ची बुलेट समोरून येणाऱ्या मिनी टेम्पो ची उजवी बाजू तोडून आत घुसली गेली. आणि यज्ञेश चा जागीच मृत्यू झाला.
सदर अपघातास मुख्यत्वे करून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे त्याची झालेली दयनीय अवस्था , अत्यल्प साईडपट्टी, महामार्गाच्या बाजूला माणगाव रेल्वे स्थानका समोर सुरू असलेले काम आणि त्या कामामुळे महामार्गालगत झालेले चिखलाचे साम्राज्य आणि तिथे जोशी वडापाव शेजारी समोर लावलेल्या प्रखर प्रकाश झोताच्या एलईडी लाईट्स यामुळे इथून येजा करणार्या वाहनचालकांच्या डोळ्यावर सदर ठिकाणी लावण्यात आलेल्या प्रखर लाईट्स चा प्रकाश पडतो आणि समोर चे वाहन नीटसे दिसून येत नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघात होतात.
सदर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे तब्बल सतरा वर्षे रखडलेल्या कामामुळे या महामार्गावर सर्वत्र जीवघेणे खड्डे, महामार्गाची झालेली चाळण, खचलेल्या साईडपट्टी, यामुळे या महामार्गावर झालेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातात आजवर सुमारे तीन हजारांहून जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कित्येक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. या महामार्गावर अनेकांना कायमचे अपंगत्व झाले आहे. तर कित्येक लोक जखमी झाले आहेत.
सदर महामार्गाची दुरावस्था आणि रखडलेले काम युद्धपातळीवर करण्यासाठी गेली अनेक वर्षे रायगड प्रेस क्लब च्या माध्यमातून अनेक प्रकारची आंदोलने केली, निवेदनं दिली, नुकतेच मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समिती च्या माध्यमातून आमरण उपोषण करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी या महामार्गाचा पाहणी दौरा केला आणि सदर महामार्ग आगामी गणेशोत्सवा पूर्वी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत शीघ्र गतीने निर्माण केला जाईल असे आश्वासन दिले. अशी आश्वासने अनेकदा अनेक नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी या आधी सुद्धा दिली होती, परंतू प्रत्यक्षात मात्र काही झाले नाही. केवळ गणेशोत्सव तोंडावर आला की आमच्या कोकणवासीयांना या महामार्गाची आठवण येते आणि आमच्या लोकप्रतिनिधींना देखील तेव्हाच जनतेची दिशाभूल करणारी आश्वासने देण्याची नौटंकी सुचते. गणेशोत्सव तोंडावर आला की या महामार्गावर तात्पुरती मलमपट्टी करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली जाते. बाकी कायमस्वरूपी असे काही नाही. निर्ढावलेल्या सरकारी यंत्रणेला या महामार्गावर असून किती निष्पाप लोकांचे बळी घ्यायचे आहेत.
सदर निष्क्रिय शासन, प्रशासन आणि सरकारी यंत्रणेच्या बेजबाबदार वृत्तीमुळे माणगाव मधील कुमार यज्ञेश प्रभाकर उभारे या अवघ्या बावीस वर्षीय निष्पाप तरुणाला आपला अनमोल जीव गमवावा लागला. यज्ञेश प्रभाकर उभारे हा तरुण नुकतेच विधी महाविद्यालयातून एल एल बी झाला होता. त्याला आपल्या जन्म दात्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्याने अहोरात्र कायद्याचा अभ्यास करून तो एक उदयोन्मुख वकील झाला होता. पुढे त्याला निष्णात विधीज्ञ होऊन आपले करीअर घडवायचे होते. परंतू येथील निष्क्रिय यंत्रणेने त्याचे हे स्वप्न कायमचे हिरावून घेतले. यज्ञेश च्या अशा अकाली जाण्या मुळे त्याच्या जन्म दात्या आई वडिलांवर व समस्त उभारे कुटुंबियांवर, नातेवाईकांवर, त्याच्या मित्र परिवारावर, आणि तमाम माणगाव करांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी दुपारी त्याच्या पार्थिवावर माणगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुःखद समयी माणगाव तालुक्यातील अफाट जनसागर उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here