अवैध दारु, विक्री, वाहतूक करणार्यांवर कारवाई
राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग;बेकायदेशीररित्या दारु विक्री, निर्मिती व वाहतूक करणार्यांवर अंकूश ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क रायगड विभागाने डिसेंबर अखेरपर्यंत धडक कारवाई केली. या कारवाईत 58 लाख 55 हजार 619 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 174 आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. अवैधरित्या दारु विक्री, वाहतूक करणार्यांना या कारवाईने राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका मिळाला आहे.
रायगड जिल्ह्यातील गावठी दारुसह बेकायदेशीररित्या अन्य देशी, विदेशी दारुची विक्री वाहतूक व निर्मिती करणार्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पथक तैनात करण्यात आले आहे. डिसेंबर महिन्यात नाताळ, थर्टी फर्स्टला दारु विक्री मोठ्या प्रमाणात होते. काहीजण वेगवेगळ्या राज्यातून बेकायदेशीर दारू आणून ती विकण्याचा प्रकार करतात. तर काही जण बनावट दारु तयार करून बाजारात विकण्याचा धाडस करीत असतात.
राज्य उत्पादन शुल्क रायगड विभागाचे अधीक्षक रविकिरण कोले यांनी हा प्रकार रोखण्यासाठी डिसेंबर 2024पासूनच कारवाई करण्याची मोहिम हाती घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. या पथकामार्फत गोवा व अन्य राज्यातून येणार्या वाहनांची तपासणी करण्यात आली. छुप्या पध्दतीने कंपनीचे लेबल लावून बनावट दारू तयार करणार्यांवर अंकुश ठेवण्यासाठी ठिकाणी गस्त घालण्यात आली. महिन्याभरात कारवाईत करीत 224 गुन्हे दाखल करण्यात आले असून 174 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सात वाहनांबरोबरच 58 लाख 55 हजार 619 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग रायगडकडून देण्यात आली.