भगतसिंग च्या मार्गाने मंत्रालयात आंदोलन करू – पप्पू देशमुख
डेरा आंदोलनात शहिदांना अभिवादन.
✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर :- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या तत्वाचा वापर करून तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मार्गाने कोविड योध्द्यांचे थकीत पगार व किमान वेतनासाठी मागील 43 दिवसांपासून डेरा आंदोलन सुरू आहे. मात्र शासन-प्रशासन कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जाणीवपूर्वक दिरंगाई करीत आहे.कामगारांच्या संयमाचा अंत सरकारने पाहू नये, वेळ पडल्यास मंत्रालयात जाऊन शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या मार्गाने आंदोलन करण्यासही मागेपुढे पाहणार नाही याची दखल महाराष्ट्र शासनाने घ्यावी,असे प्रतिपादन जन विकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केले. आज 23 मार्च रोजी शहीद दिनानिमित्त थोर क्रांतीकारी शहीद भगतसिंग-सुखदेव-राजगुरु यांना डेरा आंदोलनामध्ये अभिवादन करताना ते बोलत होते.
23 मार्च रोजी शहीद दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या डेरा आंदोलनामध्ये शहीद भगतसिंग – सुखदेव – राजगुरु यांच्या प्रतिमेला पुष्पहार व फुले अर्पण करून वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील आंदोलनकर्त्या कामगारांनी अभिवादन केले. यावेळी जनविकास सेनेचे इमदाद शेख, महिला आघाडी प्रमुख मनीषा बोबडे, जनविकास कामगार संघाचे कांचन चिंचेकर, ज्योती कांबळे, शेवंता भालेराव, प्रमोद मांगळुरकर, निलिमा वनकर, लता उईके, सिमा वासमवार, बबिता लोडेल्लीवार, भाग्यश्री मुधोळकर, प्रफुल बजाईत, राकेश मस्कावार, रवि काळे, सतीश येसांबरे, अमोल घोडमारे, सतिश घोडमारे, दर्शना झाडे, सुवर्णा नवले, सुनिता रामटेके, सपना दुर्गे, सोनाली चड्डुके इत्यादी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आपल्या अभिवादन पर भाषणामध्ये देशमुख यांनी शहीद भगतसिंग,सुखदेव व राजगुरू यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.वयाच्या 23 व्या वर्षी या शहिदांनी देशासाठी बलिदान केले. मात्र स्वतंत्र भारतामध्ये शासन-प्रशासनातील मुजोर व भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे सामान्य व कमकुवत लोकांवर अन्याय होण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झालेली आहे. अन्यायग्रस्त लोकांपेक्षा अन्याय करणाऱ्यांना कायद्याने जास्त संरक्षण मिळत आहे. विदेेेशी इंग्रजांच्या जागेवर स्वदेशी इंग्रज आलेले आहेेत. आज शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू जिवंत असते तर देशातील सामान्य नागरिकांची ही अवस्था पाहून त्यांनाही वाईट वाटले असते अशीही भावना देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली.