प्रशांत परिचारकांवरून विधानसभेत रणकंदन

47

मुंबई:जवानांबद्दल बेताल वक्तव्य करणारे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेतल्याच्या मुद्यावरून विधानसभेत आजही गदारोळ झाला. शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत परिचारक यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव मांडला. परिचारक यांच्याबाबत सरकार कोणताही निर्णय घेत नसल्यानं शिवसेनेच्या सदस्यांनी घोषणा देत सभात्याग केला. तसंच परिचारकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही शिवसेनेनं केली. प्रशांत परिचारक यांचं निलंबन रद्द केल्याच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाले आहेत. शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसह इतर विरोधी पक्षांनी भाजप सरकारला जाब विचारला. विरोधकांच्या गदारोळामुळं सभागृहाचं कामकाज सुरुवातीला १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. त्यानंतर कामकाजाला सुरुवात होताच शिवसेनेनं पुन्हा या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतला. परिचारकांवर बडतर्फीची कारवाई करावी, अशी मागणी लावून धरली. सरकार या मुद्द्यावर कोणताही निर्णय घेत नसल्यानं घोषणाबाजी करत शिवसेनेच्या सदस्यांनी सभात्याग केला. दरम्यान, परिचारक यांचं जवानांबद्दलचं वक्तव्य निषेधार्ह असून अशा व्यक्तींवर कारवाई करण्यात व्हावी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.