शहीद जवानाच्या आई-वडिलांचे उपोषण

61

पुणे: काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले हडपसर येथील जवान सौरभ फराटे यांच्या स्मारकासाठी त्यांच्या आई-वडिलांना आज पुणे महापालिकेसमोर उपोषणाला बसावं लागलं आहे. स्मारक उभारण्याबाबत अनेकदा पाठपुरावा करूनही कोणतीही कार्यवाही होत नाही, असं त्यांनी सांगितलं.
हडपसरचे सुपुत्र सौरभ फराटे यांना १७ डिसेंबर २०१६ रोजी काश्मीर येथील पम्पोर येथे दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले. देशासाठी प्राणांची आहुती देणार्या शहीद सौरभ फराटे यांचे स्मरण व्हावे, यातून प्रेरणा मिळून लष्करात जाण्यासाठी नवी पिढी सज्ज व्हावी, यासाठी त्यांचे यथोचित स्मारक उभारण्याची घोषणा त्यावेळी महापौरांनी केली होती. तसंच राज्य सरकारतर्फे मदत करणार असल्याची ग्वाही जलसंपदा राज्यमंत्र्यांनी दिली होती. स्मारक लवकरात लवकर उभारण्यात यावे, अशी इच्छा फराटे यांची आई मंगल आणि वडील नंदकुमार फराटे यांनी व्यक्त केली होती. मात्र, अद्याप ते उभारण्यात आलेले नाही. याबाबत महापालिकेकडूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. अनेकदा सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनाकडे पाठपुरावा केला, मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे फराटे दाम्पत्य महापालिकेसमोरच उपोषणाला बसले आहेत. महापालिकेनं दखल घेतली नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.