कोरोनाकाळात ट्विटरवर साजरी होतेय अनोखी भीमजयंती.

✒मनोज कांबळे, नालासोपारा प्रतिनिधी✒
नालासोपारा,दि.10 एप्रिल:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. परंतु गतवर्षी प्रमाणे यावर्षी हि कोरोना संसर्गजन्य विषाणूच संकट अधिक तीव्र झाल्याने लोकांनी मोठया प्रमाणावर एकत्र येऊन आंबेडकर जयंती साजरी करणे अशक्य झाले आहे. अशावेळी ट्विटरवर 1 एप्रिल पासून एक अनोखी भीमजयंती साजरी केली जात आहे.
ट्विटरवर आंबेडकर जयंती निम्मित 1 एप्रिल पासून #ThanksDrAmbedkar हा ट्रेंड चालू असून, या ट्रेंडद्वारे अनेक ट्विटर अकाउंटस बाबासाहेब आंबेडकरांचे विविध सामाजिक आणि राजकीय विषयावरील लिखाण आणि कार्य याची माहिती थ्रेड स्वरूपात लिहून आपल्या टाईमलाईन प्रसारित करत आहेत. आजवर या ट्रेंड अंतगर्त भारतीय संविधान, कामगार कल्याण, पाणी आणि ऊर्जा व्यवस्थापन, महिला, ओबीसी आणि आदिवासी सक्षमीकरण, शैक्षणिक सुधारणा, शेती आणि शेतकऱ्यांचा विकास, आर्थिक योजना, लोकसंख्या नियोजन, या विषयांवरील बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य प्रसारित झाले आहे. 14 एप्रिल पर्यंत सुरु राहणाऱ्या या ट्रेंडद्वारे येत्या दिवसात जाती निर्मूलन आणि बौद्धधम्म प्रसार, परराष्ट्र धोरण, पत्रकारिता या क्षेत्रातील आंबेडकरांच्या योगदानाबद्दल ट्विट्स प्रसारित केली जातील.
1 एप्रिल = भारतीय संविधान.
2 एप्रिल = आंबेडकरांचे कामगार कल्याण क्षेत्रातले कार्य.
3 एप्रिल = पाणी, ऊर्जा व्यवस्थापन आणि नियोजन.
4 एप्रिल = आंबेडकरांचे महिला सक्षमीकरणासाठी योगदान.
5 एप्रिल = आंबेडकरांचे ओबीसी आणि आदिवासी विकासासाठी योगदान .
6 एप्रिल = शैक्षणिक क्षेत्र बाबासाहेबांवरील लेख, कविता, चित्रफीत.
7 एप्रिल = शेती आणि शेतकरी.
8 एप्रिल = आर्थिक योजना आणि नियोजन.
9 एप्रिल = लोकसंख्या नियोजन आणि कुटुंब नियोजन.
10 एप्रिल = जाती निर्मूलन आणि बौद्धधम्म प्रसार.
11 एप्रिल = परराष्ट्र धोरण.
12 एप्रिल = पत्रकार बाबासाहेब आंबेडकर.
13 एप्रिल = भीमगीते, बुद्धगीते.
14 एप्रिल = तुमच्या घरातील भीमजयंती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे म्हणजे फक्त दलितांचे नेते असा चुकीचा गैरसमज बहुतांश भारतीय समाजामध्ये पसरलेला आहे. हा गैरसमज दूर करण्यासाठी आंबेडकरवादी समाजाने ट्विटरसारख्या विशेषत: तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेल्या सोशल मीडियावर #ThanksDrAmbedkar सारखा बाबासाहेब आंबेडकरांच्या चौफेर विद्वत्तेचा आणि समाजातल्या प्रत्येक घटकांसाठी केलेल्या कार्याची माहिती देणारा ट्रेंड आंबेड्करजयंती निम्मित चालवून ह्यावर्षीची आंबेडकर जयंती खरोखरच स्मरणीय बनवलेली आहे.