कोल्हापूर-पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या हत्या प्रकरणात नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भूमिका संशयास्पद असून त्यांनी जाणीवपूर्वक तपासात दिरंगाई केली आहे, असा आरोप करीत त्यांना सहआरोपी करा अशी मागणी अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबियानी आज एका पत्रकार परिषदेत केली. या हत्येत दोन आमदारांचा सहभाग होता, असा आम्हाला संशय आहे, असा धक्कादायक खुलासाही बिद्रे कुटुंबियानी पत्रकार परिषदेत केला.
अभय कुरुंदकरचा बालपणीचा मित्र महेश फळशीकर याने अश्विनी यांच्या हत्येची कबुली दिली दिल्यानंतर आज अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेतली. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भूमिका संशयास्पद असून त्यांना सहआरोपी करावे. संगीता अल्फान्सो यांची तपासासाठी पूर्णवेळ नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी या पत्रकार परिषदेत केली. अभय कुरुंदकरचा भाऊ पोलीस निरीक्षक संजय कुरुंदकर याच्याकडून साक्षीदारांवर दबाव टाकला जात आहे. त्यामुळे त्याचा हस्तक्षेप थांबवून त्याची गडचिरोलीत बदली करावी, असे बिद्रे कुटुंबियांनी म्हटले आहे.
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणातील सहभागी असलेल्या सर्व आरोपींची नार्को टेस्ट करावी. आम्ही ५ जानेवारी रोजी पोलिसांना पत्र पाठवले होते परंतु अद्याप आम्हाला त्याचं उत्तर मिळालं नाही. आम्हाला वेळीच उत्तर मिळालं नाही तर आम्ही हायकोर्टात जाऊन दाद मागू असेही बिद्रे कुटुंबियांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here