मुंबई:२००८ मध्ये बीसीसीआयच्या निवड समितीचा अध्यक्ष असताना, श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी विराट कोहलीला संघात घ्यावं, यासाठी मी आग्रही होतो. त्यावर बीसीसीआयचे तत्कालीन कोषाध्यक्ष एन. श्रीनिवासन हे नाराज होते. काही दिवसांतच मला निवड समितीच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं, असा गौप्यस्फोट भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी केला. मुंबईतील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
विराटच्या नेतृत्वाखाली भारताच्या अंडर १९ संघानं २००८ चा वर्ल्डकप जिंकला होता. त्यामुळं त्यावर्षीच्या श्रीलंका दौऱ्यासाठी सचिन तेंडुलकरच्या अनुपस्थितीत भारतीय संघात विराटला संधी दिली जावी असं माझं मत होतं. त्यावर श्रीनिवासन नाराज होते. काही दिवसांतच त्यांनी मला निवड समितीच्या अध्यक्षपदावरून हटवलं, असं वेंगसरकर यांनी सांगितलं. श्रीलंकेतील वन-डे आणि कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निवड समितीच्या बैठकीत कोहलीला वन-डे संघात स्थान मिळावं, असा प्रस्ताव मी ठेवला होता. माझ्या निर्णयाशी समितीतील इतर चार सदस्यही सहमत होते. पण प्रशिक्षक गॅरी क्रर्स्टन आणि महेंद्रसिंग धोनी यांना हे मत फारसे पटले नाही. त्यांनी कोहलीला खेळताना फारसं पाहिलं नव्हतं. त्यामुळं त्याला संघात घेण्यास ते कचरत होते, असंही वेंगसरकर म्हणाले.
श्रीनिवासन यांना तामिळनाडूचा फलंदाज एस. बद्रीनाथला संघात घ्यायचं होतं. त्यावेळी बद्रीनाथ चेन्नई सुपर किंग्जमधून खेळत होता. कोहलीला संघात घेतलं असतं तर बद्रीनाथला संघाबाहेर राहावं लागलं असतं. त्यामुळं माझ्या निर्णयानं ते नाराज होते, असंही वेंगसरकर यांनी सांगितलं.