14 वर्षाच्या मुलासह आई-वडिलांची नदीत उडी घेऊन आत्महत्या.

✒कोल्हापुर जिल्हा प्रतिनिधी ✒
कोल्हापूर,दि.16 एप्रिल:- कोल्हापुर जिल्हातील पन्हाळा तालुक्यातुन एक धक्कादायक घटना घडली आहे. 14 वर्षाच्या पोटच्या मुलाला आणी आई-बाबांनी एकत्र दोरीने बांधून कुंभी नदीपात्रात उडी घेऊन सामुहिक आत्महत्या केल्याची हृदय हेलवणारी घटना घडली आहे. शुक्रवारी (दि. 16) सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. दरम्यान आत्महत्येपूर्वी घरात लिहून ठेवलेली एक सुसाईड नोट मिळाली आहे. त्यात जीवनात अयशस्वी झालो आहे. आत्महत्यास कोणालाही जबाबदार धरु नये. वडिलांना आणि मुलीला सांभाळा असा मजकूर लिहिला आहे. मात्र नेमके आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
दीपक शंकर पाटील वय 40 वर्ष, वैशाली दीपक पाटील वय 35 वर्ष, विघ्नेश पाटील वय 14 वर्ष तिघेही रा. गोठेगाव ता. पन्हाळा असे नदीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्यां परीवाराचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, पाटील दाम्पत्याने हे गोठेगाव येथे राहत होते. आपल्या 14 वर्षीय मुलगा विघ्नेश याला आपल्याबरोबरच एकत्र दोरीने बांधून घेऊन कुंभी नदीच्या पात्रात उडी टाकून आत्महत्या केली. पाटील हे गोठे गावात आपले वडील, पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. ते शेती व्यवसाय करत होते. गुरुवारी रात्री घरातून अकरा वाजता बाहेर पडल्यानंतर या तिघांचा मध्यरात्रीपर्यंत शोध घेण्यात आला. पण बाहेर कुठेतरी गेले असतील असे समजून नातेवाईक झोपी गेले. मात्र आज सकाळी थेट कुंभी नदीच्या पात्रात या तिघांचा मृतदेह एकाच ठिकाणी आढळला, हे मृतदेह बाहेर काढतानाही पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. कारण तिन्ही मृतदेह एकमेकांना बांधलेले होते. खाऊन पिऊन सुखी असलेल्या या कुटुंबाच्या आत्महत्येने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांची 16 वर्षाची मुलगी मामाच्या गावी गेल्यामुळे या घटनेतून बचावली आहे.