कोरोना बाधीत आईच्या मृतदेहा जवळ 2 मुलींनी काढली रात्र, महानगर पालिकेची हलगर्जी भूमिका..
कोरोना बाधीत आईच्या मृतदेहा जवळ 2 मुलींनी काढली रात्र, महानगर पालिकेची हलगर्जी भूमिका..
✒युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
नागपूर,दि.23 एप्रिल:- नागपुर मध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना वायरस प्रादुर्भाव वाढत आहे. त्यांत नागपुर महानगर पालिका आणि आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात हलगर्जी पणा पण समोर येत आहे. अशीच एक खळबळजनक घटना उपराजधानीत समोर आली आहे.
नागपुर येथील गृहविलगीकरणात असलेल्या कोरोना बाधित रुग्णाला उपचार देण्यास नागपूर महापालिका पुर्णत फेल झाली आहे. शहरी आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. रुग्णांना खाट मिळत नसल्यामुळे घरीच कोरोनाबाधितांचे मृत्यू होत आहेत. घरी मृत्यू पावलेल्या कोरोनाबाधितांचे शव उचलण्याची व अंत्यसंस्काराची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र, यातही महापालिका अपयशी ठरली आहे. मनीषनगर येथील पॅंथान कॉलनीत राहणाऱ्या प्रमिला भेले वय 76 वर्ष यांचे कोरोनाना घरीच निधन झाले. प्रेमीला भेले यांचा मृत्यदेह 15 तास तसाच घरी पडून होता. पंधरा तासानंतर महापालिकेची अम्बुलंस आली.
मंगळवारी रात्री सात वाजताच्या सुमारास प्रेमीला भेले यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना शव उचलण्यासाठी कळविण्यात आले. सातनंतर मृत्यू झाल्याने बुधवारी सकाळीच शव उचलण्यात येईल, अशी ग्वाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, मृतकाची संपूर्ण माहिती दिल्यानंतरही 15 तास शववाहिका पोहोचली नाही. महापालिकेत शववाहिका आणि मनुष्यबळाचे कारण सांगण्यात येते. मात्र, यामुळे दुःखी कुटुंबीयांची चांगलीच फरफट होत आहे. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेण्यासाठी कुटुंबीय दिवसभर प्रतिक्षा करीत होते. विशेष असे की, मृतकांच्या घरासमोर अनेक जवळचे नातेवाईक आले होते.
रात्रभर घरात शव होते. घरात कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या मृतक महिलेच्या दोन मुली होत्या. बुधवारलाही सकाळी दहापर्यंत शववाहिका येईल असे सांगण्यात आल्यानंतरही शववाहिका पोहचली नव्हती. जवळचे कुटुंबीय घराबाहेर पोहोचले. आता येईल, मग येईल या प्रतिक्षेत अनेक तास कुटुंबीयांना घराबाहेर उन्हातच ताटकळत राहावे लागले. घरात आईच्या मृतदेहाजवळ दोन मुलींनी रात्र काढली. एखाद्या घरी कोरोनाबाधीत मृत्यू पावल्यानंतर किती तासात माहिती दिल्यानंतर महापालिकेने किती वेळात अंत्यसंस्काराची प्रक्रिया करावी याबाबत कुठलेही नियम महापालिकेने ठरविले नसल्याचे यावरुन स्पप्ट होते. विशेष असे की, नगरसेवकांनी शववाहिका यंत्रणेला कळविले, मात्र त्यांच्या सूचनांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या.