राज्यात लॉकडाऊन नंतर मराठवाड्यातील व्यापारी मोजत आहे शेवटची घटका.

✒राम भुतडा, लातूर जिल्हा प्रतिनिधी✒
मराठवाडा,दि.29 एप्रिल:- सध्या राज्यात मिनी लॉकडाऊन नंतर सुरू असलेल्या लॉकडाऊन मध्ये 15 मे पर्यंत वाढ झाली आहे. व्यापारी बांधवांनी सदैव कोव्हीडच्या उपाययोजना आणि त्याची अंमलबजावणी संदर्भात सकारात्मक आणि जवाबदरीने भूमिका बजावली आहे. कोणताही स्वार्थ आजपर्यंत ठेवला नाही. सदर हा 15 मे चा लॉकडाऊन पुढं किती वाढेल हे खुद्द प्रशासनास सुद्धा ठाऊक नाही. कदाचित केंद्रीय लॉकडाऊन सुद्धा येईल आमचे सहकार्य निश्चित असेलच पण आता व्यापारी बांधव धोक्याच्या पातळीवर आहेत, हे सत्य नाकारता येणार नाही. आणि हा घटक कोणत्याही क्षणी शेवटच्या घटका मोजेल असे चित्र निर्माण होत आहे.
आमचे आवाहन सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार,महापालिका सत्ताधारी व सर्व पक्षीय नेते आम्ही हात पसरायची किंवा निवेदन देण्याची वाट पाहू नका, आता आमच्या मदतीला उत्स्फूर्तपणे पुढं या जे व्यापाऱ्यांच्या मदतीला रस्त्यावर येतील, मदत करतील,त्यांचे व्यापारी बांधव ऋणी राहतील खालील आमच्या मागण्या स्थानिक प्रशासन तथा राज्य व केंद्र शासनाकडे आहेत.
1)किमान एक वर्षासाठी स्थानिक प्रशासनाने व्यवसायिक घरपट्टी, पाणी पट्टी, माफ करावे
2)महापालिका व्यवसाय परवाना शुल्क पूर्ण माफ करावे, नोंदणी निःशुल्क करावी
3)निदान यावेळी तरी मार्च-एप्रिल-मे या तीन महिन्यांचे वीजबिल माफ करून घ्यावे, सर्व लोकप्रतिनिधी यांनी त्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत.
4)ज्या व्यापारी बांधवांच्या घरातील कर्ता व्यक्ती कोव्हीड ने मयत झाला आहे, त्याला विशेष मदत, सुविधा मिळवून द्याव्यात.
5)सर्व बँक आणि वित्तीय संस्थांनी या आर्थिक वर्षातील व्याज माफ करावे व अल्प दरात कर्ज वितरण करावे, जेणेकरून व्यापारी आर्थिक विवंचनेतुन बाहेर येण्यास मदत होईल.
6)या आर्थिक वर्षातील जी एस टी कर भरण्यास,केंद्राकडून मुबलक वेळ मिळवून द्यावा,व सर्व दंडात्मक कारवाही रद्द करून घ्यावी.
7)लातूर बाजारपेठ परत उभी राहील, यासाठी मराठवाडा व्यापारी महासंघ सोबत सर्व लोकप्रतिनिधी नि सखोल चर्चा करून, व्यापार वृद्धी साठी विविध योजना कार्यान्वित कराव्यात त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत.
वरील सर्व माफी आम्ही मागत आहोत ते कर प्रामाणिकपणे आम्ही अदा करत आलेलो आहोत, कसलीही कसूर त्यात आम्ही केलेली नाही आणि वसूल करण्यात प्रशासनाने सुद्धा संधी सोडलेली नाही. पण आज मोठ्या मदतीची आम्हाला गरज आहे त्यामुळे वाऱ्यावर न सोडता आम्हाला मदत मिळवून द्यावी, आम्ही निवेदने घेऊन यायची वाट बघू नये. असे आवाहन आम्ही करत आहोत.
महासंघ खालील उपक्रम हातात घेत आहे
सर्व सामाजिक संघटनांशी आता मराठवाडा व्यापारी महासंघ संलग्न होऊन काम करेल, व्यापारी प्रश्नांसोबत आता या कठीण काळात महासंघ सामाजिक क्षेत्रात सुद्धा खारीचा वाटा देईल,
जिल्ह्यातील सर्व व्यापारी संघटनांना एका व्यासपीठावर आणून मोठी व्यापारी एकजूट करण्याचा मुख्य संकल्प आम्ही करत आहोत व्यापारी, दुकानं, बाजारपेठा हेच शहराचे मुख्य वैभव आहे. व्यापार टिकला तर शहर-राज्य-देश टिकेल विकासाच्या उपक्रमातील मुख्य घटक जर दुर्लक्षित राहिला तर शहरं बकाल होतील. सर्व मायबाप लोकप्रतिनिधी ना हात जोडून विनंती आहे “आमची दखल घ्या”
दिनेश गिल्डा अध्यक्ष मराठवाडा व्यापारी महासंघ