या कठीण काळात आपल्या राजकीय पक्षांचे जोडे बाजूला काढून एकत्र या: एड सुधीर कोठारी.

✒प्रशांत जगताप, प्रतिनिधी✒
हिंगणघात:- आपणा सर्वांना माहीतच आहे की, आपण सारेच सध्या कोविडच्या विदारक कठीण प्रसंगातून जात आहोत. सध्या या संकट समयी प्रसार माध्यमातून विविध प्रकारच्या आरोप – प्रत्यारोपांचा धुराळा उडविणे सुरू असून श्रेयवादाची लढाई लढण्यापेक्षा या परिसराच्या हिताचे दृष्टीने सर्व राजकीय पक्षांच्या नेते,कार्यकर्त्यांनी व सामाजिक संघटनांनी एकाच छता खाली येऊन आरोग्य व अन्य प्रश्नासंबंधी विचारविनिमय करण्याची वेळ आलेली आहे अशी माझी कळकळीची विनंती आहे.
शहरातील सर्वच राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटना या उच्च मानवीय मूल्यांची जपणूक करीत या कोरोनाच्या काळात जनतेला दिलासा देण्याचा प्रयन्त करीत आहेत हे अभिमानास्पद आहे. मात्र काही दिवसांपासून शोषल मीडियाच्या माध्यमातून उगीचीच एकमेकांना दूषणं देत आरोप-प्रत्यारोपाची राळ उडवील्या जात आहे हे खेदजनक आहे.या कठीण काळात आपण सर्व विविध विचारधारेच्या कार्यकर्त्यांनी आपले मतभेद दूर सारून या भागातील सर्वहारा जनतेला कसा न्याय देऊ शकतो या दृष्टीने एकत्र येऊन विधायक चर्चा करून प्रश्न तडीस नेण्याचा प्रयन्त केला पाहिजे.
या जागतिक महामारीच्या संकट काळात आपण आपल्या भागातील वैद्यकीय व्यवस्था किती सक्षम व बळकट करू शकतो की जेणे करून त्याचा दीर्घकाळ येथील जनतेला फायदा होईल याचा विचार करावयास पाहिजे.येथील उपजिल्हा रुग्णालयात 200 कोविड बेड्सची उपलब्धता ही आपली प्राथमिकता असावयास पाहिजे.व या मागणी साठी सर्वांनी एकत्र येऊन विधायक रित्या लढा उभारण्याची गरज असल्याचे माझे मत आहे.
ही लढाई कोणाच्या नेतृत्वात लढावी हा आजचा प्रश्न नसून जनतेला दिलासा देण्याची खरी गरज आहे.या साठी सर्वांनी एकत्र यावे. मी या कोरोनाच्या लढाईत एक सैनिक म्हणून आपल्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करण्यास तयार आहे. असे हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती एड सुधीर कोठारी यांनी निवेदनाचा माध्यमातुन विनंती केली